Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर मध्यरात्री चाकू हल्ला, नक्की काय घडलं? 10 महत्त्वाचे मुद्दे
Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता आणि छोटा नवाब सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सैफ अली खानच्या वांद्र्यातील घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफच्या घरातील मोलकरणीने जेव्हा चोराला पाहिलं, तेव्हा तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून झोपेत असलेला सैफ तिथे आला आणि त्याच क्षणी चोराने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सैफ अली खानवर नक्की चाकू हल्ला कसा झाला आणि त्यानतंर काय घडलं, हे आपण १० मुद्द्यातून जाणून घेऊया.
चाकू हल्ला कसा झाला आणि त्यानतंर काय घडलं?
- अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला करण्यात आला.
- मुंबईच्या वांद्र्यातील निवासस्थानी सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला.
- काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरी शिरला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
- अज्ञात व्यक्तीला पाहून घरातील मोलकरणीने आरडाओरड सुरु केली.
- मोलकरणीने आरडाआरोड केल्याने सैफ अली खानला जाग आली.
- यानंतर सैफ अली खानची अज्ञात व्यक्तीसोबत झटापट झाली.
- या झटापटीत सैफ अली खानवर ६ वार करण्यात आले.
- या हल्ल्यात सैफच्या शरीरावर २ मोठ्या जखमा झाल्या. त्याच्या मणक्यालाही दुखापत झाली.
- मध्यरात्री ३.३० वाजता सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- जखमा गंभीर असल्याने सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
मुंबई गुन्हे पोलीस शाखेकडून तपास सुरु
दरम्यान सध्या मुंबई गुन्हे पोलीस शाखा या घटनेचा तपास करत आहे. सैफच्या घरात शिरलेला चोर हा लिफ्ट किंवा इमारतीच्या मुख्य लॉबीमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला नाही. त्यामुळे इमारतीच्या शाफ्टमधून तो चोर बारा मजले चढून गेला असावा, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. चोराने सर्वांत आधी घराच्या मागे असलेल्या मोलकरणीच्या रुममध्ये प्रवेश केला. तिथे स्टाफसोबत धक्काबुक्की केल्यानंतर त्याने स्वत:ला मुलांच्या खोलीत बंद करून घेतलं. मात्र सैफवर चाकूहल्ला केल्यानंतर तिथून पळ काढण्यात तो यशस्वी ठरला. इमारतीच्या मागच्या बाजूची सुरक्षा भिंत फारशी उंच नसून तिथे फक्त एकच वॉचमन असल्याचंही तपास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List