दादांचा धनंजय मुंडेंना धक्का, अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक झालेले बहुतांश आरोपी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांचे ‘आका’ वाल्मीक कराड हे मुंडे यांचे खासम्खास आहेत. खंडणी, हत्या प्रकरणात आतापर्यंत पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची चौकशी झाली. झाली तेवढी बदनामी पुरे, आता झंझटच नको म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला बेडय़ा ठोकण्यात आल्या. त्यानंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सूर्यवंशी, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आदींना अटक करण्यात आली. यापैकी कृष्णा आंधळे हा अजून फरार आहे. आठ आरोपींपैकी बहुतेक वाल्मीक कराडच्या वर्तुळातील असून धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. सोशल मीडियावर या सर्वांचे मुंडे, कराडसोबतचे पह्टोही व्हायरल झाले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अगोदर पोलीस, नंतर सीआयडी, एसआयटीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांची चौकशी केली. अधिक बदनामी नको म्हणून अजित पवार यांनी पक्षाची जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. आता चारित्र्य पडताळणी करूनच पदाधिकाऱयांची नेमणूक करण्यात यावी, असे सक्त आदेश पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List