थॅलसेमिया, बाल कर्करोग, बोनमॅरोच्या रुग्णांना दिलासा; बोरिवलीत पालिकेने उभारली दुमजली निवासी इमारत
बोरिवली (पूर्व) येथे महापालिका संचालित ‘कॉम्प्रिहेन्सिव थॅलसेमिया केअर, बालरोग रक्तदोष – कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्रातील रुग्णांसाठी दुमजली रुग्ण निवासी इमारत उभारण्यात आली आहे. विशेषतः मुलांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत येणाऱया पालकांकरिता ही व्यवस्था मोठा दिलासा देणारी आहे. महापालिकेच्या जागेवर अॅक्सेस लाईफ असिस्टन्स फाऊंडेशन आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांच्या सहकार्याने ही इमारत उभारण्यात आली आहे.
बोरिवली (पूर्व) येथे मुंबई महापालिका संचालित ‘कॉम्प्रिहेन्सिव थॅलसेमिया केअर, बालरोग रक्तदोष-कर्करोग व बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्र’ हे रुग्णालय कार्यरत आहे. या रुग्णालयात उपचारांसाठी येणारी मुले आणि त्यांच्या पालकांसाठी निवास, जेवण इत्यादी सर्वंकष व्यवस्था उपलब्ध करून देणारी ’होम अवे फ्रॉम होम’ या इमारतीचे लोकार्पण महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी उपायुक्त संजय कुऱहाडे, उपायुक्त (परिमंडळ-7) डॉ. भाग्यश्री कापसे, आर-मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, केंद्राच्या संचालक डॉ. ममता मंगलानी, उपसंचालक डॉ. संतोष खुडे, अॅक्सेस लाईफ असिस्टन्स फाऊंडेशनचे सहसंस्थापक अंकित दवे, लार्सन अॅण्ड टुब्रोमधील सीएसआर विभागप्रमुख माबेल अब्राहम आदी उपस्थित होते.
अशा आहेत सुविधा
या दुमजली इमारतीमध्ये रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी 18 खोल्या आहेत. इमारतीमध्ये स्वयंपाकघर आहे. त्या ठिकाणी रेफ्रिजरेटर, भांडीदेखील पुरवण्यात आली आहेत. इमारतीमध्ये लॉकर, वॉशिंग मशीन तसेच लहान मुलांकरिता मनोरंजनाच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मुलांवर मोफत उपचार
खासगी रुग्णालयांमध्ये बोनमॅरो प्रत्यारोपणासाठी सुमारे 25 ते 60 लाख रुपयांदरम्यान खर्च येऊ शकतो, मात्र हेच उपचार या केंद्रात निःशुल्क होतात. केंद्राला समाजातील सर्व स्तरातील सहकार्य मिळाले आहे. या केंद्राकरिता टाटा ट्रस्ट यांनी सुरुवातीला 10 कोटी रुपये देणगी दिली होती. पंतप्रधान सहाय्यता निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांच्यासह कॉर्पोरेट जगतातून व समाजातील अनेक देणगीदारांच्या सहकार्यातून आतापर्यंत सुमारे 50 कोटी रुपयांहून अधिक निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना सर्वोत्कृष्ट उपचार मोफत देणे शक्य होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List