जिजामाता उद्यानात घुमणार सिंहगर्जना!
मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात लवकरच ‘सिंहगर्जना’ होणार आहे. यासाठी पालिका गुजरातच्या जुनागड प्राणिसंग्रहालयातून सिंहाची नर-मादी अशी जोडी आणणार आहे. यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून समन्वय साधला जात असल्याची माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून याच्या ‘मास्टर प्लॅन’ला केंद्रीय प्राणिसंग्रहालयाच्या तांत्रिक समितीने याआधीच मंजुरी दिली आहे. प्रकल्पाच्या या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असून दुसऱया टप्प्यात प्राण्यांकरिता आवासस्थाने बांधण्यात येत आहेत. या कामांपैकी वाघ, बिबटय़ा, तरस, देशी अस्वल, पक्षी पिंजरा, कोल्हा, बारशिंगा, चितळ, सांबर, आशियाई सिंह आदी प्राण्यांकरिता पिंजरे बांधून पूर्ण झाले आहेत. या उपक्रमात आता सिंहांच्या जोडय़ाही लवकरच आणल्या जाणार आहेत. मात्र सिंहांच्या जोडींच्या बदल्यात गुजरातच्या प्राणिसंग्रहालयांना झेब्राची जोडी द्यावी लागणार होती. मात्र आता झेब्राची जोडी देणे पालिकेला शक्य नसल्याने कोणत्याही मोबदल्याविना सिंहाची जोडी आणण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
– राणी बागेत आणल्या जाणाऱया सिंहांच्या निवासाकरिता नव्याने बांधण्यात आलेल्या प्रदर्शनीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर प्रदर्शनीच्या बाहेरील बाजूस सिंहांना राहण्याकरिता गीर येथील ‘मलधारी’ आदिवासी प्रजातीच्या घरांप्रमाणे आवासाची रचना करण्यात आली आहे.
– गीर येथील आशियाई सिंहांची प्रजाती प्रख्यात असल्याने त्याच धर्तीवर या ठिकाणी आवासस्थाने तयार करण्यात आली आहेत. यामध्ये सिंहांच्या नैसर्गिक गरजा भागवण्याकरिता गुहा, सिंहांना लपण्याकरिता छोटी झुडपे, सावलीच्या जागा, मोठी झाडे, जलाशयासह सिंहांना बसण्याकरिता मोठे दगड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List