धक्कादायक! भिवंडीत 80 कुपोषित बालके; सरकारची त्रिसूत्री योजना फेल
भिवंडीत एका वर्षात 80 कुपोषित बालके आढळली आहेत. मात्र ही बालके ग्रामीण भागातील नसून शहरी भागातील असल्याने एकच धक्का बसला आहे. भिवंडीतील कामगार वस्ती आणि झोपडपट्टी परिसरात ही कुपोषित बालके सापडली असून त्यांच्यावर स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे सरकारची त्रिसूत्री योजना फेल गेली आहे.
ठाणे, पालघर आणि भिवंडी ग्रामीण पट्ट्यात किंवा आदिवासी पाड्यांमध्ये कुपोषित बालकांची संख्या जास्त आहे. या बालकांमध्ये मध्यम आणि तीव्र कुपोषित असे दोन प्रकार असून सुदैवाने भिवंडीच्या शहरी भागात आढळलेली सर्व बालके मध्यम कुपोषित आहेत.
उपजिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रात गेल्या वर्षभरात दर महिन्याला सात ते आठ बालकांची नोंद झाली आहे. या बालकांवर रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. माधवी पंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आहारतज्ज्ञ डॉ. अश्विनी सूर्यवंशी, बालरोगतज्ज्ञ डॉ. मेजबीन पटेल, डॉ. सविता वस्त्रद यांचे पथक बालकांवर उपचार करत आहेत.
बालकांवर 14 दिवस उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडले जाते. त्यानंतर दरमहा त्यांच्या आरोग्याची नोंद घेतली जात असल्याची माहिती अधीक्षिका पंदारे यांनी दिली.
पालकांना बुडीत भत्ता
कुपोषित बालकांच्या उपचारावेळी त्यांच्या पालकांना बुडीत भत्ता म्हणून दिवसाला 300 रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार 14 दिवसांचे 4 हजार 200 रुपये पालकांच्या बँक खात्यात जमा केले जातात. भिवंडी शहर भागात मध्यम कुपोषित बालके आढळून येणे ही गंभीर असून शहरातील झोपडपट्टी आणि कामगार वसाहतीत जनजागृती करणे गरजेचे असल्याचेही डॉ. पंदारे यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List