राज्यातील 90 टक्के पोलीस फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात, संजय राऊत यांचा महायुती सरकारवर घणाघात
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरात चाकूने हल्ला झाला. यात तो जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा व सुव्यवस्था उरलेली नसून राज्यातील 90 टक्के पोलीस फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत, असा घणाघात राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला.
सरकार फक्त निवडणुका, सभा, संमेलन, उत्सव, प्रंतप्रधानांचे स्वागत, शिबिरं याच्यातच गुंतून पडले आहे. त्यामुळे बीडपासून मुंबईपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. मंगळवारी देशाचे पंतप्रधान मुंबईत होते. त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार आणि याच दरम्यान सैफ अली खानवर हल्ला झाला. पंतप्रधान मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चालले हा प्रश्न गृहमंत्र्यांनी स्वत:ला विचारायला हवा. आम्ही काही भाष्य केले की त्यांना यातना होतात. पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाही. रस्त्यावर, घरात, झोपड्यात, चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसताहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, सैफ अली खानवरील हल्ला खरे म्हणजे मोदींना धक्का आहे. कारण 15 दिवसांपूर्वीच सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेला होता. पंतप्रधानांनी त्याच्या कुटुंबाबरोबर एक तास व्यतीत केला होता. त्यानंतर सैफवर हल्ला झाला. या राज्यामध्ये कुणीही सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणे मुश्कील झालेले आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे समजून घेतला पाहिजे.
राज्याची 90 टक्के सुरक्षा, पोलीस हे महायुतीचे आमदार, फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी आहेत. आमचा उपशाखाप्रमुख फोडला तर त्याला दोन गनर, उपतालुकाप्रमुक फोडला तर त्याला एक गनर आणि जिल्हाप्रमुख फोडला तर त्याला 5 गनर दिले जातात. सामान्य माणसाला सुरक्षा नाही. पण गद्दार, बेइमान, भ्रष्टाचारी, बिल्डर यांना सुरक्षा आहे, असेही राऊत म्हणाले.
अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं हल्ला, घरात शिरलेल्या चोरानं भोसकलं; लीलावतीमध्ये उपचार सुरू
सैफ अली खानला सरकारने पद्मश्री दिलेला आहे. त्यालाही मुंबईत सुरक्षित राहता येत नाही हेच या हल्ल्यावरून दिसले. याचा पोलीस तपास करतील, चोराला पकडतीलही. पण असे किती चोरांना पकडणार आहात? मुळात कायद्याचे उल्लंघन करणे, हल्ला करणे ही भीती आज कुणाच्याही मनात राहिलेली नाही. यातूनच दुर्दैवाने सैफवर गंभीर हल्ला झाला आणि त्यामुळे सरकार उघडे पडले, असेही राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List