हत्या झाली त्याच दिवशी कराडची देशमुख यांना फोनवरून धमकी! एसआयटीची न्यायालयात धक्कादायक माहिती
अवादा कंपनीकडे मागितलेल्या दोन कोटींच्या खंडणीला अडथळा आणला म्हणूनच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली. वाल्मीक कराड आणि त्याच्या टोळीने हा कट रचला होता. त्यामुळेच त्यांना ‘मकोका’ लावण्यात आला. हत्या घडली त्या दिवशी कराड आणि घुले, चाटे यांचे दहा मिनिटांचे संभाषणही झाले होते. कराडने देशमुख यांना पह्नवरून धमकावले होते, असे नमूद करत एसआयटीने कराड गँगच्या कारनाम्याचे पुरावेच न्यायालयासमोर मांडले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी वाल्मीक कराडची कोठडी वाढवून देण्याची एसआयटीची मागणी मान्य करून जिल्हा न्यायालयाने त्याला सात दिवसांसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अवादा कंपनी खंडणी प्रकरणात काल वाल्मीक कराडला केज न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. न्यायालयाने कराडला न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर अत्यंत नाटय़मय घडामोडी घडल्या. तपास यंत्रणांनी क्षणाचाही वेळ न दवडता वाल्मीक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणात ‘मकोका’ लावला. प्रॉडक्शन वॉरंट दाखवून त्याचा ताबाही घेतला. वैद्यकीय तपासणी करून त्याची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. आज सकाळी पुन्हा कराडला केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मात्र तपास यंत्रणेच्या अधिकाऱयांनी सुरक्षेच्या कारणास्तव सुनावणी बीड जिल्हा न्यायालयात घेण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य केली. त्यानंतर कराडला घेऊन तपास यंत्रणांचा ताफा बीडला जिल्हा न्यायालयात आला.
न्या. सुरेखा पाटील यांच्यासमोर वाल्मीक कराडला उभे करण्यात आले. संपूर्ण सुनावणी इनपॅमेरा करण्यात आली. यावेळी फक्त दोन्ही बाजूचे वकील, तपास यंत्रणांचा अधिकारीच न्यायालयात उपस्थित होते. तपास यंत्रणांच्या वतीने सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी, तर आरोपीच्या वतीने सिद्धेश्वर ठोंबरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून युक्तिवाद केला. दोन तास चाललेल्या या युक्तिवादात एसआयटीने अनेक गौप्यस्पह्ट केले. वाल्मीक कराडला लावण्यात आलेला ‘मकोका’ चुकीचा असल्याचा दावा ठोंबरे यांनी केला. मात्र एसआयटीने ‘मकोका’ का लावला, यासंबंधीचे नऊ ठोस पुरावे सादर केले. त्याचबरोबर कराडवर आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या गुन्हय़ांची जंत्रीच न्यायालयासमोर मांडण्यात आली. हत्येच्या दिवशीचा वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांच्या मोबाईल संभाषणाचा पुरावाही सादर करण्यात आला. हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांना धमकी देण्यात आली होती. संघटित गुन्हेगारीतून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे एसआयटीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत सखोल चौकशीसाठी दहा दिवसांची वाढ करण्यात यावी, अशी विनंती एसआयटीने केली.
संतोष देशमुखांच्या हत्येचा उलगडा
अवादा कंपनीला मागण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या खंडणीमध्ये संतोष देशमुख हे अडथळा ठरले होते. त्यातूनच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांना हाल हाल करून ठार मारण्यात आल्याचे आज तपास यंत्रणांनी न्यायालयासमोर आणले. सुदर्शन घुले याला सहा डिसेंबर रोजी झालेल्या मारहाणीतून हा प्रकार घडल्याची अगोदर चर्चा होती.
कराडच्या वाईन शॉपचे ना हरकत रद्द
सुनावणीच्या या धामधुमीत केज नगरपंचायतीने वाल्मीक कराडला देशी तसेच विदेशी दारू विक्रीसाठी देण्यात आलेला नाहरकत परवाना रद्द केला. दरम्यान, आज कराडच्या समर्थनार्थ परळी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
कराडला मकोका लावला म्हणून परळी बंद करणे योग्य नाही – धस
एखादा आरोपी अटक झाला, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून शहर बंद करायचे, आरडाओरड करायची हा परळी पॅटर्न आहे. वाल्मीक कराडला ‘मकोका’ लावला म्हणून परळी बंद करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली.
पंकजा मुंडे म्हणाल्या, या गोष्टी माझ्यासाठी मॅटर करत नाहीत
कराडवर मकोका कारवाईनंतर बीडमध्ये तणाव असून, परळीत बंद आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी या गोष्टी माझ्यासाठी मॅटर करत नाहीत बीड जिल्हय़ातील तणाव कमी करण्याबाबत मात्र मी गृहमंत्र्यांशी चर्चा करेन असे सांगितले.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूची न्यायालयीन चौकशी
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही. एल. आचलिया यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीला कोणाही व्यक्तीला चौकशीसाठी बोलाविण्याचे अधिकार असणार आहेत.
एसआयटीचा दावा
29 नोव्हेंबर रोजी वाल्मीक कराडने विष्णू चाटे याच्या पह्नवरून सुनील शिंदे यांना पह्न करून काम बंद करण्याची आणि सुदर्शन सांगेल तसे करण्याची धमकी दिली. याच दिवशी सुदर्शनने कंपनीत जाऊन काम बंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर 6 डिसेंबर रोजी पुन्हा सुदर्शन आणि टोळीने अवादा कंपनीत जाऊन गार्ड, शिवाजी थोपटे यांना मारहाण केली. याच दिवशी संतोष देशमुख आणि गावकऱयांनी विरोध केल्यामुळे 9 डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करण्यात आले. या सर्व घटनांच्या काळात कराड हा आरोपींच्या संपका&त होता.
असा झाला युक्तिवाद
– संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात मोबाईलवर 10 मिनिटे संभाषण झाले. z संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 3.15 वाजेच्या दरम्यान अपहरण झाले होते असा एफआयआरमध्ये उल्लेख आहे. त्याच्या दिवशी दुपारी 3.20 मिनिटे ते 3.30 मिनिटे या काळात कराड, चाटे आणि घुले यांच्यात संभाषण झाले. z आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांची अमानुष हत्या केली. या गुन्हय़ातील आरोपी सराईत आहेत. हे सर्व जण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. z आठपैकी सातच आरोपींना अटक झालेली आहे. आठवा आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. त्याला लपण्यासाठी आरोपींनी मदत केली का? तीन आरोपींमध्ये नेमके काय बोलणे झाले याचा तपास बाकी आहे. z वाल्मीक कराडच्या परदेशातील मालमत्तेची चौकशी करायची आहे. z सुदर्शन घुले आणि इतर आरोपी अनेक दिवस फरार होते. त्यांना कुणी मदत केली याची माहिती घ्यायची आहे. z संघटित गुन्हेगारीचा छडा लावायचा आहे.
न्या. सुरेखा पाटील यांनी विचारलेले प्रश्न
– केवळ फोन कॉलच्या आधारे दोन्ही गुन्हय़ांत आरोपी बनवण्यात आले आहेत का?
– हत्येच्या गुन्ह्य़ात अटक करताना आरोपीच्या सहभागाची खात्री केली होती का?
हत्येची न्यायालयीन चौकशी होणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांची एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीला कोणत्याही व्यक्तीला चौकशीसाठी बोलावण्याचे अधिकार असतील. सहा महिन्यांत समितीने आपला अहवाल द्यायचा असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजनाही करायच्या आहेत.
धनंजय मुंडे कराड कुटुंबाला भेटले
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे वादळ घोंगावत असल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना मोदींच्या आजच्या सर्व कार्यक्रमांपासून दूर ठेवण्यात आले. आमदारांच्या बैठकीलाही ते नव्हते. परळीत तणाव असल्याचे कारण पुढे करून धनंजय मुंडे यांनी मुंबई सोडली. पहाटे ते परळीत दाखल झाले. त्यांनी वाल्मीक कराडच्या कुटुंबांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे.
वकिलांचीही घोषणाबाजी
वाल्मीक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी झाल्याचे कळताच त्याच्या समर्थकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीत कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे व अन्य वकीलही सहभागी झाले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून वाल्मीक कराडच्या निषेधाच्या घोषणा सुरू झाल्या. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दोन्ही गटांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. बीडमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र न्यायालयाच्या आवारातच जमावबंदीचे धिंडवडे निघाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List