बौद्ध, मातंग, चर्मकार कार्यकर्त्यांची धारावीत आज बैठक; विविध संघटनांच्या वतीने बैठकीचे आयोजन
दलित समाजासह अनुसूचित जातींचा संयुक्त लढा उभा करण्याच्या दृष्टीने नव्या वर्षात गुरुवार, 2 जानेवारीला मुंबईत बौद्ध, मातंग, चर्मकार समाजातील कार्यकर्त्यांची एक संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष, माजी आमदार बाबूराव माने, प्रजासत्ताक जनता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष प्रबुद्ध साठे, आंबेडकरवादी भारत मिशनचे संयोजक दिवाकर शेजवळ यांनी केले आहे. ही बैठक दुपारी 3 वाजता धारावीतील पीएमजीपी कॉलनी, धारावी बस डेपोशेजारच्या डॉ. मनोहर जोशी कॉलेजमध्ये होणार आहे.
अनुसूचित जातींना संविधानाने हमी दिलेला न्याय मिळण्याच्या दृष्टीने अनेक सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्न राज्यात अनुत्तरित आहेत तर दुसरीकडे नवनवे भावनिक प्रश्न उभे करून दलित समाजाला रस्त्यावर खेचत त्यांना टिपण्याचे धोरण सत्ताधाऱ्यांनी अवलंबले आहे. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी या एलएलबीच्या विद्यार्थ्याचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू हे त्याचे ताजे उदाहरण आहे. दरम्यान, राज्यातील अनुसूचित जातींनी न्याय्य हक्कांसाठी एकजूट उभारण्याची आणि लढय़ाचे स्वरूप, दिशा, रणनीती, आयुधे बदलण्याची नितांत गरज आहे. धारावीत होणारी दलित कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक ही त्या दिशेने पहिले पाऊल आहे, असे बाबूराव माने यांनी म्हटले आहे.
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे!
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. यामुळे केवळ बीड जिल्हा नाही तर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करून त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही माने यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List