कियारा अडवाणी रुग्णालयात दाखल? चर्चांवर अखेर टीमने सोडलं मौन
अभिनेत्री कियारा अडवाणीची तब्येत बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल केल्याच्या चर्चा रविवारी सकाळपासून सोशल मीडियावर आहेत. कियारा मुंबईतील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होती. तिच्या आगामी ‘गेम चेंजर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा हा कार्यक्रम होता. मात्र या कार्यक्रमालाही ती अनुपस्थित राहिली. त्यामुळे चाहत्यांनी तिच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अखेर तिच्या टीमकडून माहिती देण्यात आली. कियाराच्या टीमने तिच्या तब्येतीविषयीची माहिती दिली आहे.
कियाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही, असं तिच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. “सतत काम केल्याने आणि पुरेसा आराम न केल्याने कियाराला प्रचंड थकवा जाणवत होता. तिच्या आगामी गेम चेंजर या चित्रपटाचं शेड्युलसुद्धा खूप व्यग्र होतं. यादरम्यान तिला आराम करता आला नाही. म्हणूनच डॉक्टरांनी तिला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे”, अशी माहिती कियाराच्या टीमने दिली. ‘गेम चेंजर’च्या कार्यक्रमात जेव्हा सूत्रसंचालकाने कियाराच्या तब्येतीविषयी माहिती दिली, तेव्हा चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं होतं. कियाराला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने ती कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही, अशी माहिती सूत्रसंचालकाकडून देण्यात आली होती. मात्र त्यात तथ्य नसल्याचं अभिनेत्रीच्या टीमकडून सांगण्यात येतंय.
कियाराचा ‘गेम चेंजर’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यामध्ये ती दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणसोबत भूमिका साकारतेय. नुकतंच लखनऊमध्ये या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला होता. या चित्रपटाची कथा राजकारणाशी संबंधित असल्याचं कळतंय. त्यात भ्रष्ट राजकारण्यांचा सामना करणाऱ्या आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी लढणाऱ्या एका आएएस अधिकाऱ्याची कथा दाखवण्यात आली आहे. ए. शंकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून येत्या 10 जानेवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
कियाराच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने 7 फेब्रुवारी 2023 रोजी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशी लग्नगाठ बांधली. राजस्थानमध्ये हा भव्य लग्नसोहळा पार पडला होता. ‘शेरशाह’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List