“कधी-कधी त्या गोष्टी मलाच नडतात..”; ‘शिवा’ फेम पूर्वा कौशिक असं का म्हणाली?
यंदाच्या वर्षात मालिकाविश्वात ‘पारू’ आणि ‘शिवा’ या मालिकांचा डंका सर्वत्र होता. या मालिकांच्या नायिका शरयू सोनावणे आणि पूर्वा कौशिक यांचं 2024 हे वर्ष कसं होतं, याबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी आपापले खास अनुभव सांगितले. ‘शिवा’ म्हणजे पूर्वा कौशिक म्हणाली, “2024 मध्ये ‘शिवा’ मालिकेचं चित्रीकरण सुरु झालं. जशी शिवा घडत होती तशी मी ही घडत गेली. ‘शिवा’मुळे मला खूप काही नवीन शिकायला मिळत आहे. बऱ्याचदा असं होत की अनेक गोष्टी मला करता येत नव्हत्या. पण शिवामुळे त्या गोष्टी करण्यासाठी एक वेगळीच ताकद मिळत गेली. मी शिवामुळे न घाबरता आपलं मत मांडायला शिकले. माझी बेस्ट कामगिरी ही पण शिवासाठी मला मिळालेला बेस्ट नायिकेचा पुरस्कार. इतक्या महिन्यांचा आणि मेहनतीचा प्रवास त्याची ही पोचपावती म्हणायला हरकत नाही.”
“माझ्या स्वभावातल्या काही गोष्टी अजून सुधारायचा प्रयत्न सुरू आहे. कारण माझा जो स्वभाव आहे, मी ट्रान्स्परन्सीने वागणारी आहे आणि कधी-कधी त्या गोष्टी मलाच नडतात. तर या गोष्टी आणखी छान कशा करायच्या यावर माझं काम चालू आहे. 2024 मध्ये राहून गेलेली गोष्ट म्हणजे मला माझं भरतनाट्यमच शिक्षण पूर्ण करायचं आहे. मी त्यात डिप्लोमा केला आहे. त्यासोबत मला मराठी प्रायोगिक किंवा व्यावसायिक नाटक करायचं आहे. या दोन गोष्टींना 2024 मध्ये वेळ देता आला नाही. पण येत्या वर्षात मी ते पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करेन”, असं पूर्वाने सांगितलं.
‘पारू’ या मालिकेतील शरयू सोनावणे म्हणाली, “2024 चा झी मराठी अवॉर्ड्स सोहळा माझ्यासाठी संस्मरणीय होता. तो प्रसंग मला अजून लक्षात आहे. मला सर्वोत्कृष्ट मुलगी हा पुरस्कार मिळाला आणि जेव्हा तो पुरस्कार घ्यायला मी स्टेजवर गेले तेव्हा एक व्हिडीओ सुरू झाला, ज्यात माझी आई माझ्या कामाच्या प्रवासाबद्दल बोलत होती. जे माझ्यासाठी अनपेक्षित आणि भावनिक होतं. कारण मला याची कल्पना नव्हती. तो व्हिडिओ संपल्यावर मला एक प्रश्न विचारला गेला की तुझ्यासाठी हा पुरस्कार का खास आहे? मी म्हणाली माझ्या आईची खूप इच्छा होती की झी मराठीवर मी काम करावं आणि तिची अधिक इच्छा होती झी मराठी अवॉर्ड्सला यायची.”
“त्या मंचावर मी एक वाक्य बोलली की हा पुरस्कार मला माझ्या आईच्या हातून मिळाला असता तर आवडलं असतं आणि अचानक माझी आई स्टेजवर आली. तो क्षण माझ्या आयुष्यातला खूप खास आणि भावूक क्षण आहे आणि सदैव राहील. मी कधीच विचार केला नव्हता की माझ्यासोबत असं होईल. 2024 मध्ये राहिलेली गोष्ट म्हणजे 2023 मध्ये माझं लग्न झालं, तर आमचं प्लॅनिंग होतं की भारताच्या बाहेर फिरायला जायचं पण तसं काही झालं नाही. माझी मालिका ‘पारू’ सुरु झाली आणि त्यात मी व्यस्त झाले. मला असं ही वाटत की पारूची भूमिका मी अजून छान निभावू शकेन”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List