विशाल गवळीने पाच मुलींचे आयुष्य बरबाद केले, मनोरुग्ण सर्टिफिकेट दाखवून जामिनावर सुटायचा

विशाल गवळीने पाच मुलींचे आयुष्य बरबाद केले, मनोरुग्ण सर्टिफिकेट दाखवून जामिनावर सुटायचा

कल्याणमधील निष्पाप 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या करणारा नराधम विशाल गवळीचे अनेक कारनामे आता बाहेर येत आहेत. विशाल सराईत गुन्हेगार असून आतापर्यंत या हैवानाने पाच मुलींचे आयुष्य बरबाद केले आहे. याआधी त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे चार गुन्हे दाखल आहेत. पोक्सो गुन्हा दखल झाला की जामीन मिळत नाही. मात्र कायद्यातील पळवाटा त्याला माहीत होत्या. आपण मनोरुग्ण असल्याचे सर्टिफिकेट न्यायालयात सादर करून तो जामिनावर सुटायचा. त्याच्या या मोडस ऑपरेंडीमुळे मात्र कल्याणमधील अनेक कुटुंबे कायमची उद्ध्वस्त झाली आहेत.

अल्पवयीन मुलीच्या निघृण हत्येनंतर कल्याण-डोंबिवली परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. कल्याण पूर्वेत एका राजकीय नेत्याच्या आश्रयाने विशाल गवळी दहशत माजवायचा. खुनशी वृत्तीच्या विशाल गवळीची तीन लग्न झाली आहेत. बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न, चिमुकल्यांचे लैंगिक शोषण, छेडछाड, मारहाण, जबरी चोरी अशा वेगवेगळ्या प्रकरणांत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोक्सो दाखल असूनही तो जामिनावर मोकाट फिरत होता. तक्रारदारांना फिर्याद मागे घेण्यासाठी धमकावत होता. पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसाना याबाबतची माहिती देऊनही पोलिसांनी त्याला अभय दिले. त्याचा वेळीच बंदोबस्त केला असता तर निष्पाप मुलीचे प्राण वाचले असते, असे म्हणत कल्याणमधील नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.

मुळात गवळीला कोणत्या आधारावर शासकीय वा खासगी रुग्णालयाने मनोरुग्ण सर्टिफिकेट दिले याची कधीच पोलिसांनी खातरजमा केली नाही. त्यामुळे गवळीला बोगस मनोरुग्ण सर्टिफिकेट देणाऱ्या रुग्णालय आणि कोळसेवाडी पोलिसांची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मुलीचा जीव गेल्यानंतर पोलिसांना आता जाग आली असून या खटल्यात त्याला मनोरुग्ण सर्टिफिकेटचा आधार घेता येऊ नये म्हणून त्याची तज्ज्ञांच्या देखरेखीत जिल्हा रुग्णालयात मानसिक चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली.

खटला फास्ट ट्रॅकवर

संवेदनशील गुन्हा असल्याने पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी विशालला शिक्षा होण्यासाठी योग्य तपास सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये कोणतीही कसर राहणार नाही. या प्रकरणात स्पेशल काऊन्सिलची नेमणूक करण्यासाठी आमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासन स्तरावर त्यावर लवकरच निर्णय होणार आहे. तसेच हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवला जाणार आहे.
– अमरसिंग जाधव ) पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

सैतानाला वरदहस्त कुणाचा?

नराधम विशाल गवळी याचे कृत्य सैतानालाही लाजवणारे आहे. कल्याण पूर्वेतील एका राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्यानेच आतापर्यंत त्याच्या गुन्हेगारी कारनाम्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्याला आश्रय देणाऱ्या राजकीय नेत्याच्या आधी पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात, अशी संतप्त मागणी कल्याणकरांनी केली आहे.

नराधम विशालचा एन्काऊंटर करा ! संतप्त महिलांनी अॅम्ब्युलन्स अडवली

जे जे रुग्णालयातून आज सकाळी मुलीचा मृतदेह घरी आणण्यात आला. यावेळेस कल्याणमधील शेकडो नागरिकांनी मुलीच्या घरासमोर गर्दी केली होती. यात महिलांची संख्याही मोठी होती. मुलीचा मृतदेह घेऊन अॅम्ब्युलन्स स्मशानभूमीकडे निघाली असता अॅम्ब्युलन्स अडवून संतप्त महिलांनी लिंगपिसाट विशाल गवळीला फाशी द्या, फाशी देता येत नसेल तर त्याचा एन्काऊंटर करा किंवा त्याला आमच्या ताब्यात द्या, असा आक्रोश केला. पोलिसांनी महिलांची समजूत काढून अॅम्ब्युलन्स बैलबाजार स्मशानभूमीत आणली. पोलीस बंदोबस्तात पीडित मुलीच्या मृतदेहावर दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

■ राज्यात लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत. सरकारचा वचक नसल्यामुळे कल्याण पूर्वमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.
अॅड. नीरज कुमार, शहर युवाधिकारी, कल्याण

■ विशालसारख्या नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. जर त्याला कठोर शिक्षा झाली नाही तर तो अजून गुन्हे करीत राहील आणि सर्वसामान्यांचे जीव जातील.

– आशा मसुरकर

■ बालिकेवर अत्याचार करून नीच कृत्य करणाऱ्या नराधमाला कोणीही राजकीय नेत्याने पाठीशी घालू नये. जर ते पाठीशी घालत असतील तर त्यांच्यावरदेखील कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

– कल्पना कांचन

■ महाराष्ट्रात कायद्याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी अशा नराधमावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. गवळीला कठोर शिक्षा झाली तरच अन्य गुन्हेगारांवर वचक बसणार आहे.
राजकुमारी गुप्ता

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ स्वस्त कार्समध्ये मिळतात 6 एअरबॅग्स, किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरू, सेफ्टीत आहे बेस्ट ‘या’ स्वस्त कार्समध्ये मिळतात 6 एअरबॅग्स, किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरू, सेफ्टीत आहे बेस्ट
अलीकडेच अनेक लोक नवीन कार खरेदी करताना कारच्या सेफ्टी फीचर्सकडे अधिक लक्ष देताना दिसतात. ग्राहकांना पूर्णपणे सुरक्षित कार हवी आहे....
Automobile Year Ender: ‘या’ आहेत 2024 मध्ये लॉन्च झालेल्या टॉप 10 कार्स, पाहा लिस्ट
अभिनेत्री प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार करणार, सूत्रांची माहिती
अर्जून कपूर म्हणाला मी सिंगल, त्यावर मलायकानं दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाली…
रेणापूरमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर
राजघाटाऐवजी निघमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार, काँग्रेसचा आक्षेप
ज्युनिअर एनटीआरचा ‘देवरा’ चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार, तारीखही ठरली