फ्लाइंग किस, मेरी ख्रिसमस अन् Hi…; रणबीर-आलियाच्या लेकीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
जगभरात ख्रिसमस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वसामान्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत प्रतिष्ठित कपूर कुटुंबीय हे दरवर्षी ख्रिसमसनिमित्त खास फॅमिली लंचचं आयोजन करतात. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना भेटतात आणि जेवणाचा आस्वाद घेतात. या पार्टीला सर्वांत आधी अभिनेता रणबीर कपूर त्याची पत्नी आलिया भट्ट आणि मुलगी राहा कपूरसोबत पोहोचला होता. यावेळी चिमुकल्या राहाने सर्वांचं लक्ष वेधलं. पार्टीला जाण्याआधी तिघांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. राहानेही तिच्या गोड आवाजात पापाराझींना ‘हाय’ असं म्हटलं. त्यानंतर तिने ख्रिसमसच्याही शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आधी आलिया भट्ट गाडीतून उतरल्यानंतर पापाराझींसमोर येते. “थोडं हळू बोला, ती घाबरते”, असं म्हणत ती पापाराझींना विनंती करते. त्यानंतर रणबीर गाडीमधून राहाला कडेवर घेऊन उतरतो. यावेळी राहाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं पहायला मिळतं. फोटोग्राफर्सना पाहताच ती त्यांच्याकडे हातवारे करून ‘हाय’ असं म्हणते. ख्रिसमस पार्टीसाठी आलियाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला, तर रणबीरचा कॅज्युअल लूकसुद्धा नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला. एक कुटुंब म्हणून तिघं फोटोसाठी समोर आले, तेव्हा पापाराझींसाठी राहाच आकर्षणाचा विषय ठरली. सर्वजण तिला हाक मारून फोटोसाठी पोझ द्यायला सांगत होते. या फोटो सेशननंतर जेव्हा राहा परत जाऊ लागली, तेव्हा मागे वळून तिने पापाराझींना ‘मेरी ख्रिसमस’ असं म्हटलं आणि त्यांना फ्लाइंग किससुद्धा दिला.
कपूर कुटुंबीयांसाठी ख्रिसमसची ही परंपरा खूप विशेष आहे. कारण याच ख्रिसमिसनिमित्त गेल्या वर्षी रणबीर आणि आलियाने त्यांच्या मुलीचा चेहरा पहिल्यांदा माध्यमांना दाखवला होता. त्यानंतर क्षणार्धात राहा कपूरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. तोपर्यंत राहाचा चेहरा रणबीर आणि आलियाने माध्यमांसमोर दाखवला नव्हता.
करीना कपूरच्या चॅट शोमध्ये आलियाने याविषयी प्रतिक्रिया दिली होती. “एकेदिवशी रणबीर आणि मी सहज गप्पा मारत होतो. तेव्हा त्याने मला कोणकोणत्या गोष्टींची भीती वाटते, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी आम्ही सर्व मुद्द्यांवर मोकळेपणे बोललो. तेव्हाच त्याने राहाचा चेहरा मीडियासमोर आणण्याविषयी सांगितलं. हे आमचं आयुष्य आहे, मला मान्य आहे. पण तुम्ही माझ्या मुलीचा चेहरा बघू शकत नाही, असा माझा त्यामागे हेतू नव्हता. मी तिच्याबाबतीत फक्त अधिक काळजी घेत होती”, असं आलिया म्हणाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List