संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती पक्षपातीपणे वागतेय, विरोधकांचा आवाज दडपतेय! – संजय राऊत
संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती पक्षपातीपणे वागताना स्पष्ट दिसत आहे. सभापतींचे काम सभागृहात संयम आणि समतोल राखणे आहे. पण ते सत्ताधारी पक्षाच्या बाजुने झुकून विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आमच्यापुढे अविश्वास ठराव आणून आमच्या भूमिका मांडण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नव्हता, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
राज्यसभेत सातत्याने सरकारी पक्षाची बाजू लावून धरणारे सभापती जगदीप धनखड चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेत इंडिया आघाडीने धनखड यांच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणला आहे. या अविश्वास ठरावावर 60 खासदारांच्या सह्या आहेत. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला राऊत उत्तर देत होते.
सभागृहात सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या गोंधळावरही राऊत यांनी परखड भाष्य केले. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद ही सर्व सभागृहं चालू देण्याची जबाबदारी, कर्तव्य हे सत्ताधारी पक्षाचे असते. पण सध्याचा सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाला काही संविधानिक अधिकार आहेत, देशामध्ये लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे, निवडून आलेले आमदार, खासदार राज्याच्या किंवा राष्ट्राच्या हितावर आपल्या भूमिका मांडू शकतात हे मानायला तयार नाही. गौतम अदानीचा विषय हा कुणाचा व्यक्तिगत नाही. अमेरिकेतील न्यायालयाने त्यांच्यावर काही ठपका ठेवला आहे. हा भ्रष्टाचाराचा मुद्दा असून त्या विषयावर आम्ही बोलायला उभे राहिलो, प्रश्न विचारायला लागलो तर आम्हाला बोलू दिले जात नाही. सभागृह तहकूब केले जाते, असा आरोप राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, 95 वर्षीय जॉर्ज सोरोस भारतातील लोकशाही, संसद अस्थिर करत आहेत असा शोध भाजपने लावला. त्या मुद्द्यावरून सत्ताधारी लोक लोकसभा, राज्यसभा चालू देत नाही. सभागृह हे चर्चेचे ठिकाण आहे. चर्चा व्हायला पाहिजे. विरोधी पक्षाने किंवा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेले केलेल्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, पण बोलूच देत नाहीत.
सत्ताधारी पक्ष सभागृह सुरू झाल्यावर गोंधळ घालायला सुरुवात करतो ही या जगातील पहिली घटना आहे. इतिहासामध्ये अशा प्रकारच्या घटना फार दुर्मिळ आहे. सत्ताधाऱ्यांनी संयम पाळायचा असतो. विरोधी पक्षाचे काम आवाज उठवणे आहे. हा लोकशाहीचा एक भाग आहे. पण विरोधी पक्षाला बोलूच द्यायचे नाही, विरोधी पक्षाची अवहेलना करायची, विरोधी पक्षनेत्याचा माइक बंद करायचा ही कुठली लोकशाही आहे? असा सवाल राऊत यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List