तनुश्री दत्ताच्या ‘मी टू’च्या आरोपांवर नाना पाटेकरांनी सोडलं मौन; म्हणाले ‘कोणत्या गोष्टीचा राग?’
2018 मध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तनुश्रीच्या आरोपांच्या आधारे नाना पाटेकरांविरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आली होती. मात्र त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे आणि साक्षीदार नसल्याने वर्षभरात हा खटला मिटला. या घटनेनंतर नानांनी एका मुलाखतीत तनुश्रीच्या आरोपांवर मौन सोडलं होतं. “माझ्याविरोधात आरोप खोटे आहेत हे मला माहित होतं आणि म्हणूनच मी त्या गोष्टीवर चिडलो किंवा रागावलो नाही”, असं नाना या मुलाखतीत म्हणाले.
काय होते तनुश्री दत्ताचे आरोप?
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एक गाणं फक्त माझ्यावरच चित्रीत होणार होतं, असा दावा तनुश्रीने केला होता. “मात्र तरीही नाना पाटेकर सेटवर आले आणि त्यांनी बळजबरीने माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. डान्स स्टेप शिकवण्याच्या बहाण्याने ते माझ्याशी गैरवर्तणूक करत होते. यामुळे मला प्रचंड अनकम्फर्टेबल आणि असुरक्षित वाटत होतं”, असा आरोप तिने केला होता.
नाना पाटेकर काय म्हणाले?
‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखीतत तनुश्रीच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना नाना पाटेकर म्हणाले, “ते सर्व आरोप खोटे होते, हे मला माहित होतं. त्यामुळे मी कधी रागावलो नाही. जेव्हा सर्वकाही खोटं असेल, तेव्हा मी का रागवावं? त्या गोष्टी खूप जुन्या आहेत, ज्या आधीच घडून गेल्या आहेत. त्याबद्दल आता का बोलावं? प्रत्येकाला सत्य माहित आहे. जर तसं काही झालंच नाही, तर त्यावेळी मी काय बोलावं? अचानक कोणीतरी समोर येऊन बोलतं की तुम्ही हे केलंत, ते केलंत. अशा आरोपांवर मी काय प्रतिक्रिया द्यायला हवी? मी काही केलं नाही असं म्हणावं का? मी काहीच केलं नाही, हे सत्य मला माहित आहे.”
सोशल मीडियामुळे लोकांचा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलतो, याविषयीही नाना व्यक्त झाले. “मी दुसऱ्यांचं तोंड कसं बंद करू शकतो? जर एखाद्याने काही चुकीचं केलं असेल तर त्याला मी थेट कोर्टात घेऊन जाईन. पण माझ्याकडे हे सर्व करायलाही वेळ नाही. आपण किती योग्य आणि अयोग्य आहोत हे आपल्याला माहित असायला पाहिजे आणि तेच महत्त्वाचं आहे. माझ्याबद्दल ऑनलाइन काय काय लिहिलं जातं, ते मी वाचत नाही. मग ते माझं कौतुक असो किंवा टीका”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List