खातेधारकाला पैसे मिळवून देण्याऐवजी बेजबाबदार ठरवले! स्टेट बँकेला सुप्रीम कोर्टाचा दणका
ऑनलाइन फसवणुकीत बँक खात्यातील सर्व पैसे गमावलेल्या खातेधारकाच्या विनंतीकडे दुर्लक्ष करणे स्टेट बँक ऑफ इंडियाला महागात पडले. खातेधारकाचे 94 हजार रुपये मिळवून देण्याऐवजी बँकेने त्यालाच बेजबाबदार ठरवले. याविरोधात दाखल केलेल्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि बँकेला संबंधित खातेधारकाचे 94 हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
आसाम येथील ग्राहकाने ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर तातडीने स्टेट बँकेच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क केला होता आणि तक्रार नोंदवली होती. त्यावेळी बँक प्रशासनाने ग्राहकाची तक्रार नोंदवून घेतली. मात्र त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही केली नाही. ग्राहकाच्या झालेल्या फसवणुकीबाबत सायबर पोलिसांत तक्रार नोंदवली नाही. तसेच ‘पॅशबॅक’साठी ग्राहकाने केलेल्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. बँकेच्या या बेफिकीर कारभाराविरुद्ध ग्राहकाने आरबीआय बँकिंग लोकपाल, गुवाहाटी उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. ग्राहकाचा बँकेविरोधातील लढा सर्वोच्च न्यायालयात यशस्वी झाला. ग्राहकाने ऑनलाइन फसवणुकीत जे 94 हजार रुपये गमावले ते पैसे बँकेने ग्राहकाला परत द्यावेत, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List