इंदूर बनणार देशातील पहिले भिकारीमुक्त शहर; भिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यास 1 हजार रुपये!
इंदूर शहर हे भिकाऱ्यांसाठी वरदान ठरू लागले होते. जास्त कमाई होत असल्याने शहरात इतर राज्यांमधून येणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या भरमसाठ काढली होती. एका भिकाऱ्याकडे 45 हजारांची रोख रक्कमही सापडली होती.
इंदूर शहराला भिकारीमुक्त शहर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक नवीन मोहीम हाती घेतली आहे. इंदूर शहरात भीक मागणे, भीक देणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई केली जात आहे. रस्त्यांवर जर भिकारी काही सामानाची विक्री करत असेल तर अशा भिकाऱ्यांविरोधातसुद्धा पोलीस कारवाई करत आहेत. प्रशासनाने यासंबंधीचा नवा नियम 2 जानेवारीपासून लागू केला आहे. शहरात राहत असलेल्या भिकाऱ्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून 1 हजार रुपये रोख दिले जात आहेत. भिकाऱ्याची माहिती देण्यासाठी प्रशासनाकडून एक मोबाईल नंबरसुद्धा जारी करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांत 200 व्यक्तींनी फोन करून भिकाऱ्यांसंबंधी माहिती दिली, परंतु यातील केवळ 12 व्यक्तींची माहिती खरी ठरली. या 12 व्यक्तींपैकी सहा व्यक्तींना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून त्यांना 1 हजार रुपये रोख देण्यात आले, असे जिल्हाधिकारी आशीष सिंह यांनी सांगितले.
एक वर्षापर्यंत तुरुंगवास
बंदी असतानाही शहरात भीक मागणे गुन्हा असल्याने आणि कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत 223 भिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कायद्यानुसार, सदर व्यक्ती दोषी आढळल्यास एक वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 5 हजार रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतो, अशी तरतूद आहे. चार महिन्यांत शहरातील 400 लोकांना एका आश्रमात पाठवण्यात आले, तर 64 छोटय़ा मुलांना सामाजिक संस्थेच्या हवाली केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List