दहशतीसह विविध गुन्ह्यांत फरारी आरोपीला अटक, मोहोळ पोलिसांची कामगिरी; आरोपी शिंदे गटाचा माजी तालुकाप्रमुख
विनापरवाना शस्त्राद्वारे हवेत फायरिंग करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपीला बेड्या ठोकण्यात मोहोळ पोलिसांना यश आले आहे. प्रशांत ऊर्फ बापू तुकाराम भोसले (रा. खवणी, ता. मोहोळ) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीला कोर्टासमोर हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. हा आरोपी शिंदे गटाचा मोहोळचा माजी तालुकाप्रमुख आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी रोजी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक युवक हातात पिस्तूल घेऊन ती जवळ उभा असणाऱ्या लोकांकडे रोखून धरत आणि हवेत फायरिंग करीत दहशत माजवत असल्याचे दिसत आहे. हा युवक प्रशांत ऊर्फ बापू तुकाराम भोसले असल्याचे समजल्यानंतर पोलीस अभिलेखावर तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे शस्त्र परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हवालदार गोपाळ बजरंग साखरे यांनी गुन्हा दाखल केला. या घटनेपासून भोसले फरारी होता. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळालेल्या माहितीनुसार, भोसले पोखरापूर येथे अंत्यविधी करीता येणार असल्याचे समजले. त्यानंतर मोहोळ पोलिसांच्या पथकाने सापळा रचून प्रशांत भोसलेला अटक केली.
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन आतकरे, हवालदार कोरे, गोरे, ढवळे, सोनकर, पुजारी, बिराजदार, सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आरोपी भोसलेवर अनेक गुन्हे आरोपी प्रशांत भोसलेवर सोलापूर जिल्ह्यासह शहर, पुणे जिल्हा, मुंबई, दारूबंदी विभाग सोलापूर, सांगली, मिरज पोलीस स्टेशन, कोल्हापूर, राजापूर येथे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
घरातून स्पोर्टिंग रायफल, ४ जिवंत काडतुसे, पिस्टल जप्त
पोलीस कोठडीमध्ये असलेल्या आरोपी प्रशांत ऊर्फ बापू भोसले याच्या घराची झडती घेऊन पोलिसांनी अवैध शस्त्रे, एक काळ्या रंगाची स्पोर्टिंग रायफल व त्याकरिता असणारी चार जिवंत काडतुसे, सिल्व्हर रंगाचे पिस्टल, त्याच्या मॅगझिनमध्ये सात जिवंत काडतुसे आढळली. ती पोलिसांनी जप्त केली आहेत, असे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List