प्रसिद्ध गायकाच्या मुलाकडून काळ्या जादूची कबुली; ‘बिग बॉस’मध्ये जाण्यासाठी कोंबडीचा बळी
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानूने ‘बिग बॉस’च्या चौदाव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत जान सानूसुद्धा गायनक्षेत्रात आपलं नशीब आजमावतोय. नुकतीच त्याने पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये त्याने स्वत:विषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी त्याने काळ्या जादूची मदत घेतल्याचा खुलासा जान सानूने या मुलाखतीत केला. यानंतर त्याने वशीकरणाबद्दलही सविस्तरपणे सांगितलं आहे.
पारस छाब्राने या मुलाखतीत जानला विचारलं की त्याने घराणेशाहीच्या मदतीने ‘बिग बॉस 14’मध्ये भाग घेतला होता का? जानचे वडील कुमार सानू इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक असल्याने त्यांच्या ओळखीने त्याला बिग बॉसमध्ये संधी मिळाली का, असं त्याला विचारण्यात आलं होतं. त्यावर त्याने वडिलांच्या नव्हे तर काळ्या जादूच्या मदतीने शोमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं. “मी बंगाली आहे आणि तिथे काळी जादू करणं ही गोष्ट खूप सामान्य आहे. मी एका महिलेला भेटलो होतो. तिथे अनेक बाहुल्या आणि संमोहित केलेली माकडं होती. ती काळी जादू करण्यासाठीच बसली होती. त्या महिलेनं मला एक पशुबळी द्यायला सांगितलं आणि त्या बदल्यात माझी एक इच्छा पूर्ण होईल असं म्हटलं. ती माकडं म्हणजे प्रत्यक्षात काळ्या जादूने माकडात रुपांतरित केलेली माणसंच होती. ते सर्व फक्त त्या महिलेचं ऐकत होते”, असा धक्कादायक खुलासा तो करतो.
जान सानूचं ऐकून पारस छाब्राच्या अंगावर शहारे येतात. तो जानला पुढे काय घडलं याविषयी विचारतो. तेव्हा जान सांगतो, “काळ्या जादूवर काही पैसे खर्च केल्यानंतर आणि एका कोंबडीचा बळी दिल्यानंतर मला बिग बॉसच्या निर्मात्यांकडून शोसाठी कॉल आला होता.” हे ऐकल्यानंतर पारसच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. तेव्हा जान त्याला मस्करी करत असल्याचं सांगतो.
‘बिग बॉस 14’मध्ये जानने त्याच्या खासगी आयुष्याविषयीही काही खुलासे केले होते. आई सहा महिन्यांची गरोदर असताना वडिलांसोबत घटस्फोट झाल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे वडिलांची माझ्या आयुष्यात विशेष भूमिका नाहीत, असं तो म्हणाला. आईनेच जानला लहानाचं मोठं केलं. “बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी मला याचीच चिंता होती की माझ्या आईची काळजी कोण घेणार”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List