संपूर्ण विश्वातील महिलांपैकी मी फक्त तिलाच निवडेन..; विवेक ओबेरॉयकडून प्रेमाची कबुली
अभिनेता विवेक ओबेरॉयचं खासगी आयुष्य जणू खुल्या किताबासारखंच आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि त्याच्या अफेअरच्या चर्चा जगजाहीर होत्या. जेवढी त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा झाली, त्याहून अधिक त्यांच्या ब्रेकअपची झाली. आत दोघंही आपापल्या आयुष्यात खुश आहेत. ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चनशी लग्न केलं. तर विवेकने प्रियांका अल्वाशी लग्नगाठ बांधली. विवेक आणि प्रियांकाचं हे अरेंज मॅरेज होतं. तरीही एकाच भेटीत विवेकने तिच्याशीच लग्न करायचं निश्चित केलं होतं. या दोघांच्या लग्नाला आता 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक त्याच्या पत्नी आणि वैवाहिक आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.
‘मेन्स एक्सपी’ला दिलेल्या या मुलाखतीत विवेक म्हणाला, “मी गेल्या 14 वर्षांपासून माझ्या पत्नीवर वेड्यासारखा प्रेम करतोय. आजही जेव्हा ती मेकअप करते, तेव्हा मी तिची प्रशंसा करतो. हा एक वेगळ्याच प्रकारचा रोमान्स आहे. मी प्रेमात आधी खूप मोठमोठ्या गोष्टी केल्या आहेत. पण त्याहीपेक्षा छोट्या-छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, हे मला प्रियांकामुळे समजलं. मी तिला फ्लॉरेन्समध्ये अत्यंत ग्रँड पद्धतीने प्रपोज केलं होतं. मात्र हे तुम्ही प्रत्येक वेळी करू शकत नाही. अशा वेळी छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.”
ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपनंतर विवेक प्रियांकाला भेटला होता. त्यावेळी त्याची कोणाशीच लग्न करण्याची इच्छा नव्हती. “मला या मुलीला भेटायचं नाही इथपासून ते मी तिच्याशिवाय जगू शकत नाही इथपर्यंतचा हा माझा प्रवास आहे. तिला पाहताच मला समजलं होतं की तिच्यासोबतच मला माझं पूर्ण आयुष्य घालवायचं आहे. माझ्या मते लग्न म्हणजे एक टीम म्हणून एकमेकांचा विचार करून वागणं आणि काम करणं. या नात्यात विश्वास, प्रेम, आदर टिकला पाहिजे. कारण जरी तुम्ही एकमेकांसोबत रोज राहत असलात तरी तुम्ही पार्टनरला गृहीत धरू शकत नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराचा अनादर नाही केला पाहिजे. लग्नसंस्थेतून खूप काही शिकायला मिळतं,” अशा शब्दांत विवेक व्यक्त झाला.
या मुलाखतीत विवेकने ‘ओपन मॅरेज’ या संकल्पनेविषयीही आपलं स्पष्ट मत मांडलं. याविषयी तो पुढे म्हणाला, “मला ओपन मॅरेजची संकल्पनाच समजत नाही. एकतर तुम्ही एकमेकांसाठीच नात्यात असता किंवा मग काहीच नसतं. ओपन एक्स्लुसिव्ह असं कोणतंच नातं नसतं. माझ्या मते मी एक टिपिकल पंजाबी मुलगा आहे. कदाचित मी या संस्कृतीसाठी किंवा इतक्या खुलेपणाने जगण्यासाठी बनलोच नाही. मी खूप देशी आहे.”
“प्रियांकासोबतची माझी कमिटमेंट खूप वेगळी आहे. चौदा वर्षांच्या संसारात जेव्हा मी दररोज सकाळी उठून तिच्याकडे पाहतो आणि स्वत:लाच विचारतो की, या विश्वातल्या सर्व महिलांपैकी मी आजही तिची निवड करेन का? तर त्याचं उत्तर हो असंच येतं. मी तिचीच निवड करेन. तिला माझ्याकडून फक्त वेळेची अपेक्षा असते. वेळ मिळाल्यावर जेव्हा कधी मी तिच्यासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करतो, तेव्हा ती खूप उत्सुक होते. तिला महागड्या गोष्टींची फार हौस नाही.” विवेक ओबेरॉय आणि प्रियांका अल्वा यांनी 2010 मध्ये लग्न केलं. या दोघांना दोन मुलं असून गेल्या काही वर्षांपासून ते दुबईत राहत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List