ग्रामीण भागातील साक्षरता दरात 10 टक्क्यांनी वाढ,सरकारची लोकसभेत माहिती; महिलांची लक्षणीय प्रगती
महिलांच्या साक्षरतेत लक्षणीय वाढ झाल्यामुळे हिंदुस्थानातील ग्रामीण भागात 2011 ते 2021 या दशकात साक्षरतेच्या बाबतीत चांगली प्रगती झाली आहे. देशातील ग्रामीण साक्षरता दर 2011 मध्ये 67.77 टक्के इतका होता तो 2023-24 पर्यंत 77.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. महिलांचा साक्षरता दर 57.93 टक्क्यांवरून 70.4 टक्क्यांवर पोहोचला, तर पुरुषांच्या साक्षरता दरात 77.15 टक्क्यांवरून 84.7 एवढी वाढ झाली आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत ही आकडेवारी सादर केली.
तसेच ‘उल्लास-नव भारत साक्षरता’ कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात प्रौढ साक्षरतेत सुधारणा होत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत दोन कोटींहून अधिक जण नोंदणीकृत झाले, तर पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक मूल्यमापन चाचणी एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी दिली. ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपात हा कार्यक्रम राबवला जातो. मोबाईल अॅपद्वारे 26 भाषांमध्ये शिक्षण साहित्य पुरवले जाते. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 10.87 लाख नोंदणीकृत झाले असून चार लाख जणांनी चाचणी दिली आहे, मात्र बिहारने अद्याप हा कार्यक्रम राबवला नाही. अद्यापही 100 टक्के ग्रामीण साक्षरता एक मोठे आव्हान आहे, असेही चौधरी म्हणाले.
महिलांच्या साक्षरतेत चांगली वाढ
महिलांच्या साक्षरता दरात 14.5 टक्क्यांनी वाढ झाली. 100 टक्के ग्रामीण साक्षरता करण्यासाठी सरकारने काय प्रयत्न केले याबद्दल चौधरी यांनी सांगितले की, सरकारने ‘समग्र शिक्षा अभियान’, ‘साक्षर भारत’, ‘पढना-लिखना अभियान’ तसेच ‘उल्लास-नव भारत साक्षरता’ कार्यक्रम अशा योजनांद्वारे ग्रामीण भागात साक्षरता दर वाढवण्यासाठी प्रयत्न केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List