राज्य मंत्रिमंडळातील काही जागा रिक्त ठेवूनच विस्तार मार्गी लागणार, मंत्र्याची यादी दिल्लीतून ‘फायनल’ होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाला. तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाचे सोमवारी सूप वाजले. नागपूरचे हिवाळी अधिवेशन सहा दिवसांवर आले तरीही वित्त आणि नियोजन, महसूल, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, जलसंपदा या महत्त्वाच्या खात्यांबाबत अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाची यादी पाठवण्यात आली आहे. दिल्लीतून हिरवा पंदील मिळाला तरी राज्य मंत्रिमंडळातील काही जागा रिक्त ठेवून विस्तार मार्गी लावला जाणार आहे.
राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचे सोमवारी सूप वाजल्यानंतर महायुती सरकारला आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. भाजपसह शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांची यादी दिल्लीतून भाजप श्रेष्ठाRकडून निश्चित केली जाणार असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटात धाकधूक आहे. तीनही घटक पक्षातील खातेवाटपाचे आणि मंत्र्यांच्या संख्येचे सूत्र अंतिम झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला येत्या 16 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनापूर्वी म्हणजे 14 किंवा 15 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे.
शिंदे गटाच्या नावांवर आक्षेप
शिंदे गटाकडून संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांच्या नावांना भाजपने प्रामुख्याने आक्षेप घेतल्याचे समजते. तरीही शिंदे यांनी या आमदारांच्या नावाचा आग्रह भाजपकडे धरला आहे.
ज्येष्ठांना आराम देणार
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून धक्कातंत्र अवलंबवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, बबनराव लोणीकर, डॉ. विजयकुमार गावीत, सुरेश खाडे या ज्येष्ठ आमदारांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. मंत्रीपदाचे चेहरे निवडताना भाजपकडून सामाजिक समतोल साधला जाणार आहे, मात्र काही जुने चेहरे मंत्रिमंडळात ठेवून नव्या चेहऱयांना संधी देण्याबाबत भाजपकडून विचार सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List