Kurla Bus Accident : त्या चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता, पहिल्यांदाच चालवली बस; तपासातून धक्कादायक माहिती उघड
Kurla Bus Accident : कुर्ला पश्चिमेकडे सोमवारी रात्री झालेल्या अपघातामुळे संपूर्ण मुंबई हादरली. कुर्ल्यात भरधाव वेगाने आलेल्या एका बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने अनेक वाहनांना धडक देत नागरिकांना चिरडलं. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. सध्या जखमी लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. या व्हिडीओत या अपघाताचा थरकाप पाहायला मिळत आहे. त्यातच आता पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
कुर्ल्यात नेमकं काय घडलं?
सोमवारी रात्री 9.50 च्या सुमारास कुर्ला पश्चिमेकडील अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळील एसजी बारवे रोडवर एक बस सुसाट वेगाने आले. यानंतर भरधाव वेगाने येणारी अनियंत्रित बस गर्दीत घुसली आणि ते पाहून लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी अनियंत्रित झालेल्या भरधाव वेगाने आलेल्या बसने 30-40 गाड्यांना जोरदार धडक दिली. यावेळी रिक्षा, दुचाकी तसेच रस्त्यावर अनेक नागरिकांना या बसने चिरडले. त्यामुळे काही नागरिक जखमी झाले. तर काहींना यात जीव गमवावा लागला.
या दुर्घटनेनंतर संतप्त जमावाने बसचा ड्रायव्हर संजय मोरे (54) पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. नागरिकांच्या मते संजय मोरे हा बसचा ड्रयव्हर मद्यधुंद अवस्थेतेत बस चालवत होता. संजय मोरे याला काल पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवानही जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर आता सध्या या घटनेची चौकशी सुरु आहे.
“काल पहिल्यांदाच बेस्ट बस चालवली”
कुर्ला पोलिसांनी या बस अपघातबद्दल कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील अपघातग्रस्त बस चालवणाऱ्या चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तो कंत्राटी चालक म्हणून १ डिसेंबरला कामावर रुजू झाला होता. त्याने काल पहिल्यांदाच बेस्ट बस चालवली, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
तसेच संजय मोरे हा लहान गाड्या चालवायचा. त्याला मोठ्या गाड्या चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता, असेही चौकशीत समोर आले आहे. या अपघातानंतर बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला असावा तसेच चालक मद्यधुंद अवस्थेतेत असावा असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र पोलीस तपासात कुर्ल्यातील त्या बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झालेला नव्हता. तसेच बस चालकाने मद्यपानही केलेलं नव्हतं, अशी माहिती समोर आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List