लामजेवाडी येथील अपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू
चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात बारामतीमधील दोन शिकाऊ पायलट मृत्युमुखी पडले असून, दोनजण गंभीर जखमी झाले. भिगवण-बारामती रस्त्यावर लामजेवाडी येथे रविवारी पहाटे ही घटना घडली.
दक्षू विष्णू शर्मा (21, रा. 242/2, रामभवन, श्रीनगर गल्ली, नं. 3, शकुरपूर), आदित्य जयदास कणसे (21, रा. कामोठे, पनवेल, रायगड मूळ रा. बिहार) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर, कृष्णांशू मंगल सिंग (21, रा. बिहार) व चेष्टा ज्योतिप्रकाश बिष्णोई (21, रा. जोधपूर, राजस्थान) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर भिगवण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बारामती येथील रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेतील चार विद्यार्थी बारामतीहून भिगवणच्या दिशेने टाटा कारमधून निघाले होते. यावेळी वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. हे प्रशिक्षणार्थी बारामती येथे पायलटचे शिक्षण घेत आहेत. घटनेची माहिती समजताच, भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. जखमींना गाडीतून बाहेर काढले. त्याचप्रमाणे बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, बारामतीच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी वैशाली पाटील, भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी जखमी रुग्णांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
भरधाव वेगाचा बळी
बारामती-भिगवण रस्त्याचे सध्या विस्तारीकरण झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावरती वाहने बेदकारपणे चालवली जात आहेत. सध्या या मार्गावरती आठ दिवसांपूर्वीच अनेक ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले आहेत. याचाही अनेकजणांना अंदाज येत नाही. त्यामुळेदेखील छोटे-मोठे अपघात घडले आहेत. त्यामुळे वाहनांवर नियंत्रण आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या रस्त्यावरून सध्या उसाच्या ट्रक्टरचीदेखील मोठ्या प्रमाणात वाहतूकदेखील केली जात आहे. त्यावरदेखील पोलिसांनी लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List