भाजपा युतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली; सरकार आता ‘लाडका भाऊ’साठी काम करणार, नाना पटोले यांचा टोला
‘लाडकी बहीण’मुळेच पुन्हा सत्तेत आलो असे भाजपा युतीचे नेते सांगत आहेत, पण आता निवडणुका संपल्याने लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही. लाडकी बहीणचा विषय आता संपला आहे. सरकारचा शपथविधी होताच दोन दिवसात एका ‘लाडक्या भावाला’ एक हजार कोटी रुपयांची संपत्ती परत मिळाली आहे. ही तर सुरुवात असून ‘आगे आगे देखो होता है क्या? म्हणत महाराष्ट्रात सत्तेत आलेले भाजपा युतीचे सरकार हे ‘लाडक्या भावा’ साठी काम करणारे सरकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर अभिनंदनाचा ठराव मांडला असता त्यावरच चर्चा होणे अपेक्षित होते. पण सत्ताधारी पक्षातील सदस्य मतदारांची थट्टा करत होते. मारकवाडीप्रमाणे इतर गावातही ग्रामसभा ठराव करत आहेत. मतदार हा राजा आहे, त्याला मताचा अधिकार असून आपले मत कुठे गेले हे जनता विचारत आहे. मारकडवाडीतील लोक मॉक पोलिंग करणार होते तो अधिकार गावकऱ्यांना आहे, तो कोणीही हिरावू शकत नाही. मारकडवाडीच्या मुद्द्यावर सभागृहातही चर्चा झाली पाहिजे पण सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करते, जनभावना ओळखत नाही ही सत्तेची मस्ती आहे, असे पटोले यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेतेपदासाठी सदस्य संख्येची अडचण नाही
महाराष्ट्र विधिमंडळाला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. अनेकदा काँग्रेसकडे मोठे बहुमत असतानाही त्यावेळी विरोधी पक्षांची सदस्य संख्या न पहाता विरोधी पक्षनेते पद दिले होते. हीच परंपरा लक्षात घेऊन विधान सभेचा विरोधीपक्ष नेता व विधानसभेचा उपाध्यक्ष विरोधी पक्षांचा असावा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत मांडली आहे. सरकारही सकारात्मक असून नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता होईल अशी अपेक्षा आहे असे नाना पटोले म्हणाले.
भाजपचे सरकार असताना बेळगावात मराठी भाषिकांवर अन्याय
कर्नाटकात भाजपाचे सरकार असताना बेळगावात मराठी भाषिकांवर अत्याचार करण्यात आले होते. त्यावेळी भाजपा गप्प बसले होते आणि आता ते का बोलत आहेत. केंद्रात सरकार भाजपचे आहे, त्यांनी काही निर्णय घ्यावा. भाजप धर्माच्या नावावर मते मागून राजकारण करत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List