जैन साधकाच्या वेशात मंदिरात चोऱ्या करणारा अटक
जैन साधकाची वस्त्रे परिधान करून मंदिरात प्रवेश करीत पूजाअर्चा केल्याचा बहाणा करून किमती ऐवज चोरी करणाऱ्या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मुकुट, सोन्याची चैन 4 लाख 20 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. नरेश आगरचंद जैन (वय 48, रा. बॉम्बे चाळ, टँक गिरगाव, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने यापूर्वी घाटकोपर, वाई, चिखली, डोंबिवली परिसरातील मंदिरात 8 ते 10 ठिकाणी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
पूनावाला गार्डनसमोर जैन मंदिरात शिरून चोरट्यांनी सोन्याचा मुकुट आणि सोनसाखळी चोरी केली होती. जैन मंदिरात वाढत्या चोऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर तब्बल 700 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, एका जैन मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी नरेश कैद झाला. पांढरी वस्त्रे परिधान करून पूजाअर्चा केल्यानंतर दागिने चोरी करतानाचे त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळविले. आरोपी नरेश जैन हा मुंबईत राहत असल्याची माहिती पोलीस हवालदार सागर केकाण यांना मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने आर्थिक अडचणीतून चोरी केल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलीस एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे, पोलीस अंमलदार शंकर संपते, कुंदन शिंदे, श्रीधर पाटील, दिनेश भांदुर्गे, रफीक नदाफ, सतीश कुंभार यांनी केली.
जैन साधकाच्या वेशात चोरी करणाऱ्या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीदेखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
– युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस ठाणे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List