Sharmila Thackeray : मला अमितचा मोठा विजय हवाय, छोटा विजय नकोय – शर्मिला ठाकरे
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माहीममध्ये बिग फाईट आहे. माहिम विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे माहिममधून निवडणूक रिंगणात आहे. अमित ठाकरेंसमोर तीन वेळचे आमदार सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचं आव्हान आहे. सदा सरवणकर यांची मतदारसंघावर पकड आहे. त्यांनी नगरसेवक ते आमदार असा प्रवास केला आहे. माहिम विधानसभा क्षेत्रात सरवणकर, ठाकरे गट आणि मनसे या तिघांना मानणारा मतदार आहे. याआधीच्या निवडणुकीत हे दिसून आलय.
सदा सरवणकर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फुट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेले. त्यांना हरवणं इतकं सोप नाहीय. सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुद्धा झाले. पण सदा सरवणकर लढवय्या स्वभावाचे आहेत. ते शेवटपर्यंत निवडणूक लढवण्यावर ठाम होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 4 नोव्हेंबरला नाट्यमय घडामोडी घडल्या. सदा सरवणकर यांच्यानुसार त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटायचं होतं, पण ठाकरेंनी भेट नाकारली.
‘वरळीसारखी आम्ही निवडणूक लढवत नाहीय’
“अमित पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. तो लढतो आहे. महिनाभर आम्ही प्रचारासाठी लोकांच्या घरोघरी जात होतो, आम्हाला अनेक प्रश्न समजले आहेत, ते सोडवायचे आहेत. अमित ठाकरे यांच्याविरोधातल्या उमेदवारांना आम्ही अर्ज मागे घ्या असेही म्हटले नाही. उलट ते शेवटच्या दिवशी भेटायला आले तर आम्ही ते ही टाळलं” असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं. “दुसऱ्या पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात घेऊन आरशासमोर उभे राहून मागच्या निवडणुकीत वरळीत निवडणूक लढण्यात आली होती, तशी आम्ही निवडणूक लढवत नाहीय. मला अमितचा अभिमान आहे की तो स्वतः मैदानात उतरून या गोष्टी करतो आहे. तो निवडून येईल याची 100 टक्के खात्री आहे. मला अमितचा मोठा विजय हवाय छोटा विजय नकोय” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List