उद्धव ठाकरे यांच्या नावाने खोट्या बातम्यांचा प्रसार; भाजप आमदार नितेश राणे आणि समाजमाध्यमांवर कारवाई करा,शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे मागणी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खोटय़ा बातमीच्या आधारे बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर पसरवणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर, तसेच हा मजकूर प्रसारित करणाऱया समाजमाध्यमांच्या अॅडमिनवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्या अकाऊंटवर बंदी घातली जावी अशी मागणी शिवसेनेने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडे केली आहे.
शिवसेना नेते, खासदार व पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकाऱयांना पत्र दिले आहे. भाजपचे देवगड विधानसभेचे आमदार व प्रवक्ते नितेश राणे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील एक खोटी बातमी पोस्ट करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या बातमीवर काही अश्लाघ्य मजकूर लिहून त्याच्याही पोस्ट काही सोशल मीडिया अकाऊंटवर करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार असे करणे हा गुन्हा आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अपप्रचारामुळे सर्व शिवसैनिकांच्याही भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील निवडणुकीत पराभवाची भीती दिसू लागल्याने, पायाखालची वाळू सरकल्याने प्रचारादरम्यान धार्मिक विद्वेष वाढवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे, याकडेही या पत्राद्वारे निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले गेले आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात धार्मिक उद्रेक होऊन निवडणुकांचे वातावरण गढूळ करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे या खोटय़ा प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नितेश राणे व हा मजकूर प्रसिद्ध करणाऱया इतरही समाजमाध्यम अकाऊंटधारकांच्या अकाऊंटवर बंदी आणावी तसेच संबंधित खातेधारकांवर कायद्याद्वारे कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी पत्रात करण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List