संजय शिरसाट यांच्यासाठी 500 रुपयांचे खुलेआम वाटप;भाजपच्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा
घमेंड, मग्रुरी आणि सत्तेच्या हव्यासामुळे पराभवाच्या गर्तेकडे निघालेल्या मिंध्यांनी छत्रपती संभाजीनगरात पैशाचा बाजार मांडला आहे. पश्चिम मतदारसंघात गद्दार उमेदवार संजय शिरसाट यांच्यासाठी 500 रुपयांचे खुलेआम वाटप करण्यात येत आहे. दलित आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये बोटाला शाई लावून मतदानाला न जाण्यासाठी दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. जागरूक मतदारांनी मिंध्यांचे पितळ उघडे पाडल्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने दोन गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील इंदिरानगर भागात सोमवारी रात्री बोटाला शाई लावून मतदानाला न येण्यासाठी दीड हजार रूपये वाटण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी अशोक वाकोडे आणि नदीम पठाण या दोघांना रंगेहाथ पकडले. यावेळी मिंध्यांची गुत्तेदारी करणारे तसेच काही दुकानदारही पैशाच्या बॅगा घेऊन तेथेच उभे होते. पोलीस येताच हे टोळके पसार झाले. या ठिकाणाहून दोन कोटींपेक्षा जास्त रक्कम ताब्यात घेण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे सौजन्य दाखवले. मात्र संजय शिरसाट यांनी दबाव आणल्यामुळे पोलिसांनी दीड हजारच जप्त केल्याची नोंद केली. त्यामुळे हे दोन कोटी कोठून आले आणि कुठे गेले असा सवाल करण्यात येत आहे. या प्रकरणात अशोक वाकोडे आणि नदीम पठाण या दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दुसऱया घटनेत एका व्हायरल व्हिडीओवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देवळाई तांडा येथे भाजपचे माजी नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे लोकांना पाचशे रूपयांच्या करकरीत नोटा वाटप करताना या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. मात्र पोलिसांनी डोळय़ावर पट्टी बांधल्याने या प्रकरणात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पराभवाच्या भीतीने मिंध्यांनी आता मतदारसंघात पैशाचा बाजार मांडला आहे. पोलीसही या कामी मिंध्यांची चाकरी करत आहेत. मतदानापूर्वी बोटाला लावण्याची शाई कुणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली असा प्रश्न उपस्थित करून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List