पिंक मतदान केंद्राची चर्चा, सेल्फी पॉईंट पण आकर्षणाचा केंद्र, पण फोटु काढणार तरी कसा? निवडणूक आयोगच विसरला नियमाचा अडथळा
राज्यात विधानसभा निवडणुकीचा महाउत्सव दिसत आहे. सकाळपासूनच राज्यातील विविध मतदान केंद्रावर सर्वच वयोगटातील मतदारांनी भाऊगर्दी केली आहे. मतदानाचा उत्साह संपूर्ण राज्यात दिसून येत आहे. मुंबईतील मतदार केंद्रावर पण गर्दी उसळली आहे. यंदा पिंक मतदान केंद्राचा वेगळा प्रयोग निवडणूक आयोगाने राबवला आहे. त्याची खास चर्चा होत आहे. तर सेल्फी पॉईंट पण आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले आहे. पण निवडणूक आयोगाच्या एका नियमामुळे सेल्फी पॉईंट पाहून अनेक मतदारांचा हिरमोड झाला आहे.
मुंबईत 420 उमेदवार
मुंबईत विधानसभेला एकूण 36 मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदारसंघात एकूण 420 उमेदवार आहेत. तर 1 कोटी 2 लाख, 29 हजार 708 मतदार हे त्यांचे भवितव्य ठरवतील. तर 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये 10 हजार 117 मतदान केंद्र उभारण्यात आले. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 46 हजार 816 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 25 हजार 696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत. 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी अगोदरच गृह मतदान झाले आहे. अधिकार्यांच्या उपस्थित हे मतदान घेण्यात आले. मुंबईतील 6 हजार 272 ज्येष्ठ नागरिकांनी गृह मतदानाचा हक्क बजावला.
गुलाबी मतदान केंद्राची चर्चा
मुंबईसह राज्यातील काही मतदान केंद्रांवर पहिल्यांदाच पिंक पोलिंग बुथ उभारण्याचा प्रयोग राबविण्यात आला आहे. मुंबईत सुद्धा गुलाब मतदान केंद्राची चर्चा आहे. मतदान केंद्रावर मतदानाचा टक्का वाढावा आणि मतदारांचा वेळ वाचावा यासाठी हा अभिनव प्रयोग राबविण्यात आला आहे. मतदार जेव्हा मतदान केंद्रावर येईल त्यावेळी त्याला एक स्लिप देण्यात येईल. त्या स्लिपच्या मागे एक रंगाची पटी, ठिपका असेल. त्यानुसार पिवळा, गुलाबी, निळा, आकाशी, लाल रंगाचे मतदान केंद्र करण्यात आले आहे. त्यासाठी त्याच रंगाचे खास कार्पेट सुद्धा अंथरण्यात आले आहे. त्यावरून चालत जाऊन त्या रंगाच्या मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
ही एक हटके संकल्पना आहे.
सेल्फी काढू तरी कसा?
काही मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि तरुणांचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सेल्फी पॉइंटचा प्रयोग गेल्या काही निवडणुकांपासून सुरू केला आहे. याठिकाणी मतदान झाल्यावर मतदारांना फोटो काढता येईल. पण यावेळी 100 मीटर परिसरात मोबाईल न वापरण्याची ताकीद देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी मोबाईल एकतर घरी ठेवल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List