भाजपाकडून खुलेआम पैसे वाटप होत असताना निवडणूक आयोग काय झोपला आहे का? सचिन सावंत यांचा हल्लाबोल
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. लोकशाही व संविधानाचा गळा घोटून सत्ताधारी पक्ष साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर खुलेआमपणे करत आहेत. सर्वात आश्चर्याची व गंभीर बाब म्हणजे हे सर्व घडत असताना पोलीस दल व निवडणूक आयोग काय झोपा काढत आहे का? असा सवाल करून भाजपा नेते विनोद तावडेंवर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणे धरू, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी दिला आहे.
विरार प्रकरणी टिळक भवनमध्ये बोलताना सचिन सावंत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व युतीने विधानसभा निवडणुकीत लाजलज्जा सर्वकाही सोडली असून खुलेआमपणे पैशांचे वाटप केले जात आहे. शिंदेसेनेच्या एका आमदाराशी संबधित वाहनात मोठी रक्कम वाहनात सापडली पण त्याचे पुढे काय झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघातही सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराकडून पैसे वाटत केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता विरारमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याचे पैसे वाटण्याचे प्रकरण उघड झाले आहे. सत्तातुराणां न भय न लज्जा! अशी भारतीय जनता पक्षाची वर्तणूक आहे. पराभवाची चाहूल लागल्याने भाजपा व सत्ताधारी पक्ष पैशाचा वापर करून लोकशाहीचे धिंडवडे काढत आहेत.
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार प्रचार संपल्यानंतर मतदार संघाबाहेरील कोणताही नेता दुसऱ्या मतदारसंघात राहू शकत नाही असे असताना विनोद तावडे काल संध्याकाळ पासून विरारमध्ये काय करत होते, हा प्रश्न आहे. तावडेंवर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२६ नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे, या कायद्यानुसार दोषीला 2 वर्षांची शिक्षा होऊ शकते. राज्यात निवडणुका जाहीर झाल्यापासून निवडणूक अधिकारी स्वतंत्र व निष्पक्षपाती भूमिका घेत नाहीत हा आमचा आक्षेप आहे. लोकशाहीचा हा उत्सव पारदर्शक, निर्भय व निष्पक्षपातीपणे पार पडावा यासाठी निवडणूक आयोगाची भूमिका महत्वाची असून तसे त्यांनी कृतीतून दाखवावे, असेही सचिन सावंत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List