Udhav Thackeray : मुख्यमंत्र्यांपासून दोन्ही सभागृहाचे सभापती ओरिजनल शिवसेनेचे, मग ठाकरेंचं वावडं का?; उद्धव ठाकरे यांचा सवाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. आता अखेरच्या टप्प्यात हातघाईची लढाई सुरू झाली आहे. मतदानाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पहिली तोफ डागली आहे. मुख्यमंत्र्यांपासून दोन्ही सभागृहाचे सभापती ओरिजनल शिवसेनेचे आहेत. मग त्यांना माझचं का वावडं आहे, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे. त्यांनी भाजपवर आज चांगलेच तोंडसूख घेतले. मुंबईत मनसेची एंट्री झाल्यापासून मराठी माणसाच्या विभाजनाची भीती आणि फटका सर्वच पक्षांना सतावत आहेत. भाजपला मात्र मनसेच्या रूपाने नवीन मित्र मिळाला आहे. त्यामुळे मुंबई पट्ट्यातील राजकीय समीकरणं आणि सत्ता कारणाची गणितं बदलू शकतात.
का पाडलं महाविकास आघाडीचं सरकार?
महाराष्ट्राच्या हक्काचा एक कण देत नव्हतो. एवढा दरारा दिल्लीत केला होता. म्हणून त्यांनी आपलं सरकार पाडलं. त्यांना महाराष्ट्र विकायचा आहे. गुजरातला सर्व न्यायचं आहे. त्यामुळे गद्दारी करून सर्व विकलं जात आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी आज केला. त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे गटाने एक प्रकारे आज प्रचाराचा नारळच फोडला म्हटलं तर वावगं ठरू नये.
मग माझं वावडं का?
गद्दाराला मुख्यमंत्री म्हणून बसवलं. मुख्यमंत्री ओरिजन शिवसेनेचा, दोन्ही सभागृहाचे सभापती ओरिजिनल शिवसेनेचे, विधानसभेचा विरोधी पक्षनेता ओरिजन शिवसेनेचा, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेनेचे. सर्वच जर शिवसेनेचे बसलेले आहेत तर तुम्हाला उद्धव ठाकरेंचं वावडं का, असा रोकडा सवाल त्यांनी भाजपला विचारला.
संपूर्ण शिवसेनाच तिकडे आहे. तुम्हाला शिवसेनेशिवाय राज्य करता येत नाही ही भाजपची हालत आहे. मुख्यमंत्र्यांपासून दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेता सर्व शिवसेनेचे आहेत, पण शिवसेना नकोय, उद्धव ठाकरे नकोय, तुम्ही तुमचं उपाशी राहिला तरी चालेल महाराष्ट्र अदानीच्या घशात घालणार हे भाजपची नीती आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List