ठाणे जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन; 43 हत्यारे जप्त; 41 जणांना अटक
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ऑल आऊट ऑपरेशन पार पडले. या ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी 31 गावठी कट्टे, 7 कोयते, 5 तलवारी अशी एकूण 43 हत्यारे जप्त केली आहेत. ही बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्या 41 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या ऑपरेशनसाठी पोलीस आयुक्तालय हद्दीतील 312 पोलीस अधिकारी व 1 हजार 288 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे व पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री 11 ते रविवारी पहाटे 2 वाजेपर्यंत ऑल आऊट ऑपरेशन पार पडले. या दरम्यान पोलिसांनी शस्त्रसाठ्यांसह बेकायदा दारूचे अड्डेदेखील उद्ध्वस्त केले. यावेळी पोलिसांनी 5 लाख 7 हजार 484 रुपये किमतीचा दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी 185 जणांवर कारवाई केली. त्याचप्रमाणे 74 हॉटेल, 64 लॉज, 39 बीयर बार, 42 डान्स बार व इतर आस्थापनांवर कारवाई केली. तसेच रेकॉर्डवरील 140 गुन्हेगारांची झाडाझडती घेऊन त्यापैकी 47 तडीपार गुंडांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली, तर वाहतूक पोलिसांनी 2149 वाहनांवर दंडात्मक कारवाई करत 18 लाख 58 हजार 750 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त
गुन्हे शाखा कक्ष तीनच्या पथकाने नालासोपाऱ्याच्या कळंब परिसरात असलेला गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. कळंबच्या वासुदेव बुवानगर येथील एका शेतात शेडमध्ये बेकायदेशीर हातभट्टी सुरू असल्याची तक्रार पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापेमारी करत 5 हजार लिटर नवसागर गुल मिश्रित रसायन, 280 लिटर गावठी दारू व त्यासाठी लागणारे साहित्य असा 2 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहापुरात 824 जणांवर कारवाई
शहापूर विधानसभा मतदारसंघातील वासिंद, शहापूर, किन्हवली व कसारा या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 225 परवानाधारक शस्त्रे पोलिसांनी जमा केली आहेत. दरम्यान मतदारसंघात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी 824 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यात शहापूरमधील 241, कसाऱ्यातील 178, वासिंदमधील 189 व किन्हवली येथून 216 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List