‘आई कुठे काय करते’ मधील अनिरुद्ध साकारताना…; मिलिंद गवळींनी व्यक्त केली मनातील खंत
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय आहे. पण पाच वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. या मालिकेतील अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. यात त्यांनी मनातील खंत बोलून दाखवली आहे. कायम वाट्याला व्हिलनच्या भूमिका आल्या. व्हिलनच्या भूमिकेसाठी पाहिलं गेलं. अनिरुद्ध ही भूमिका देखील तशीच होती. पण आता ‘व्हिलन’वाली इमेज पुसण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मिलिंद गवळी म्हणालेत.
मिलिंद गवळी यांची पोस्ट
अंतर्मुख, साधा, निष्कपटी, वय वर्ष सात, घरी पाहुणे आले की त्यांच्याबरोबर चित्रपटगृहात सिनेमा बघायला मिळायचं, शाळेपेक्षा थिएटरचं जास्ती आकर्षण निर्माण झालं, सिनेमा पॅराडाईजसारखा, माझी आई मला ‘हिरोच म्हणत असत. मग बालपणीच मी निश्चय केला, आपण पण सिनेमातच जायचं, आणि मोठ्या पडद्यावर हिरो व्हायचं, मग त्याच्या अंतर्मनामध्ये एक प्रवास सुरू झाला, सिनेमा च्या संबंधित जो कोणी भेटला. त्याच्याशी ओळख करून घ्यायची, मैत्री करायची, जेणेकरून त्या पडद्यापर्यंत पोहोचता येईल, बालपणापासून आतापर्यंत या प्रवासात त्याला असंख लबाड, फसवे, भामटे लोकं पण भेटली, जे माझ्यासारख्या अज्ञानी, सिनेमाचं वेड असणार्या मुलं मुली यांना गंडवायचं दुकानच उकडून बसलेत,
या क्षेत्रामध्ये जे genuinely कामं करत असतात, ती मंडळी दूर दूर पर्यंत आपल्याला दिसतही नाहीत, मग त्यांना भेटायचं तर फारच कठीण असतं, पण माझ्या नशिबाने पहिल्यांदा मला भेटले वडिलांचे परिचयाचे प्रोड्युसर धनपत मेहता यांच्या “हम बच्चे हिंदुस्तान के” मध्ये काम दिलं, त्यामध्ये ऍक्टर होते किशोर नमित कपूर , त्यांना मी आवडलो, त्यांनी मला नेलं गोविंद सरर्य्या यांच्याकडे , त्यांनी मला “हिरो” केलं त्यांच्या “वक्त से पहले” हिंदी बाल चित्रपटात, तो चित्रपट बघून केरल वरून मुंबईत आलेल्या प्रियदर्शनने त्यांच्या “आर्यन” या चित्रपटामध्ये रोमँटिक हिरोची छोटी भूमिका दिली, मग काय मला वाटलं आता मी हिरो झालोच, पण त्यानंतरच खरंतर माझा खडतर प्रवास सुरू झाला.
गोविंद मुनीस यांच्याबरोबर “तित्तली” सिरीयल, प्रदीप मैनी यांचा “वर्तमान” चित्रपट, दूरदर्शन केंद्र, सगळे छान पॉझिटिव्ह रोल करत होतो. अचानक एक दिवस मला संजीव भट्टाचार्य यांनी “कॅम्पस”सिरीयल साठी विचारलं, रोल होता “रवी भटनागर” नावाचा, कॉलेजमधला व्हिलन, त्या वेळेला व्हिलन हा शब्द ऐकून मी पटकन “नाही” म्हणालो, संजीवजी ची पत्नी गीता, त्या मला म्हणाल्या चार एपिसोड चा तर प्रश्न आहे, मी म्हटलं ‘व्हिलन’चा माझ्यावर ठपका लागेल, त्या म्हणाल्या 4 एपिसोड ने नाही लागणार, माझं मन मारून मी तो व्हिलन केला, कॅम्पसच्या चार एपिसोड चे २०० एपिसोड झाले.
माझं instinct किंवा माझं intuition खरं झालं, त्यानंतर असंख्य हिरो चे रोल केले, पण फिरून फिरून व्हिलनच माझ्या वाटेला आला, आज पाच वर्ष “आई कुठे काय करते” मधला अनिरुद्ध देशमुख त्याचाच परिणाम आहे. या इतक्या स्टाँग विलनच्या इमेज कशा पुसायच्या असतात? भविष्यामध्ये त्या पुसल्या जातील का? का अशाच प्रकारच्या भूमिका वाट्याला येतील?
पण मी मात्र परत प्रयत्न करणार, सगळं नव्याने सुरू करण्याचा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List