कार्तिकी यात्रेसाठी आठ लाख बुंदी लाडू प्रसाद
माघी, चैत्री, आषाढी व कार्तिकी अशा चार मुख्य यात्रा पंढरपूर येथे साजऱ्या करण्यात येतात. यामध्ये कार्तिकी यात्रा सुरू असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या भाविकांना ‘श्रीं’चा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर ‘श्रीं’चा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करीत असतो. या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल यादृष्टीने 8 लाख बुंदी लाडू प्रसाद व 50 हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी ठेवण्यात येत आहे. यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. 70 ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रती पाकीट 20 रुपयांप्रमाणे व 25 ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रती पाकीट 10 रुपयांप्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी पश्चिमद्वार, उत्तरद्वार, श्री संत तुकाराम भवन असे एकूण तीन स्टॉल असून, सर्व स्टॉल 24 तास खुले ठेवण्यात येत आहेत.
या लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेतून खाण्यास योग्य असल्याबाबत तपासणी करून घेण्यात आली आहे. बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत यांना देण्यात आली आहे, याशिवाय सुमारे 90 कर्मचारी 24 तास परिश्रम घेत असल्याचे मनोज श्रोत्री यांनी सांगितले.
नियमांचे पालन करून प्रसादनिर्मिती
बुंदी लाडू प्रसाद एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणा, विलायची या सुकामेव्याच्या पदार्थांपासून, तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून तयार करण्यात येत आहे.
अतिक्रमणे हटवावीत
कार्तिकी यात्रेत चंद्रभागा नदीपात्रात स्नानासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, येथे सुरू असलेले रसपानगृहे, टपऱ्या यांनी अतिक्रमणे केली आहेत. रसपानगृहामुळे नदीपात्रात कचरा तयार होत आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत नदीपात्रात सुरू असलेले रसपानगृहे, टपऱ्या, हातगाडे यांना परवानगी देऊ नये, अशी मागणी भाविक करीत आहेत. तसेच मोकाट जनावरांचा बदोबस्त करण्याचीदेखील मागणी करण्यात येत आहे.
चंद्रभागा चकाचक
पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कार्तिकी यात्रेच्या पाश्र्वभूमीवर चंद्रभागा नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली. यामुळे नदीपात्र चकाचक दिसू लागले आहे. कार्तिकी यात्रेमुळे पंढरीत भाविकांची गर्दी वाढत आहे. येथे आलेला भाविक चंद्रभागा स्नान करण्यास प्रथम प्राधान्य देत आहे. चंद्रभागा नदीपात्रात मुबलक पाणी आहे. या पाण्यात भाविकांना पवित्र स्नान करता यावे. त्यांना अस्वच्छतेचा सामना करावा लागू नये, म्हणून नगरपरिषदेने ही स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. नदीपात्रात साचलेले निर्माल्य, द्रोण, पत्रावळ्या, फाटके कपडे, चप्पल, कचरा गोळा करून त्याचे ढीग तयार करण्यात आले. गोळा केलेला कचरा ट्रॅक्टर, टिपरच्या साहाय्याने उचलून कचरा डेपोवर नेण्यात आला. नदीपात्र स्वच्छ करण्यात येत असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List