पत्नीची हत्या करून पोलीस स्थानकात पोहोचला ‘खुनी’ पती, लहान मुलानं सांगितला थरकाप उडवणारा घटनाक्रम
उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यात पत्नीला दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना बघून पती संतापला आणि त्याने चाकूने पत्नीचा गळा कापून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी पती पोलीस चौकीत पोहोचला आणि पत्नीची हत्या करुन आल्याचे पोलिसांना सांगितले. ज्यानंतर पोलीस, सीओ आणि एसपी घटनास्थळावर पोहोचले. त्यानंतर मृत महिलेचा मुलाने थरकाप उडवणारा घटनाक्रम सांगितला.
संभलच्या हजरतनगर गढी परिसरातील सोनू सैनी यांचा विवाह सात वर्षांपूर्वी मुरादाबाद येथील निवासी राखीसोबत झाला होता. मागच्या काही दिवसांपासून सोनूची पत्नी राखी कायम फोनवर व्यस्त असायची. तिला सतत कोणाचे तरी फोन यायचे. त्यावरुन दाम्पत्यामध्ये कायम वाद व्हायचे. मात्र तरीही राखीचे फोनवर बोलणे काही कमी झाले नाही. अशात सोनूचा संशय वाढत गेला. मागच्या मंगळवारी सोनू कामासंदर्भात बाहेर गेला होता. मात्र दुपारी अचानक तो घरी परतला. घरी आल्यावर पाहिले की, त्याची पत्नी राखी कोणाशीतरी फोनवर गप्पा मारत होती. पत्नीला दुसऱ्यासोबत फोनवर बोलताना पाहिल्यावर पती संतापला. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि संतापलेल्या सोनूने राखीचा गळा कापून हत्या केली.
हत्या केल्यानंतर सोनू आपल्या मुलांना घेऊन पोलीस चौकीत पोहोचला आणि पोलिसांसमोर पत्नीच्या हत्येची कबुली दिली. ते ऐकून पोलिसांना धक्का बसला. त्यानंतर हजरतनगर गढी ठाण्याचे प्रभारी मोहित काजला आणि सीओ अनुज चौधरी घटनास्थळी पोहोचले. तर काही वेळात एसपी कृष्ण कुमार बिश्नोई आणि एएसपी श्रीशंचंद्रही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हा मृत महिलेचा मुलगा आहे. वडिलांनी आईची हत्या केल्याचे मुलाने पोलिसांना सांगितले. त्याने माझ्यासमोर चाकूने आईचा गळा कापला. त्याच्यासोबत इतरही लोक होते.
त्याचवेळी, मृत महिलेच्या बहिणीने सांगितले की, राखी आणि सोनूमध्ये गेल्या 4 महिन्यांपासून भांडण सुरू होते. मात्र गेल्या दीड महिन्यात वाद अधिकच वाढला होता. राखी फोनवर बोलण्यासाठी माझ्या घरी गेली होती पण ती परत आल्यावर ही घटना घडली. चार जणांनी त्याचे हात धरून त्याची मान कापल्याचे मुलाने सांगितले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List