Maharashtra Assembly Election 2024 – महाविकास आघाडीचं ठरलं! शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी 85 चा फॉर्म्युला; 270 जागांवर सहमती
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं असून तूर्त शिवसेना 85, काँग्रेस 85 आणि राष्ट्रवादी 85 असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. तिन्ही पक्षांमध्ये 270 जागांवर सहमती झाली असून उर्वरित 18 जागांबाबत आघाडीतील इतर घटक पक्षांसोबत उद्यापासून चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. शिवसेना नेते संजय राऊत, जयंत पाटील, नाना पटोले, कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती देण्यात आली.
उर्वरित 18 जागांसंदर्भात मित्रपक्षांशी आजपासून चर्चा
महाविकास आघाडीतील जागा वाटपाबद्दल प्रसारमाध्यमांकडून सातत्याने विचारणा होत होती. आज जागा वाटपाची अंतिम बैठक पार पडली. जागा वाटप अत्यंत सुरळीतपणे पूर्ण झाले असून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांची एकूण 270 जागांवर सहमती झाली आहे, अशी माहिती यावेळी संजय राऊत यांनी दिली. ऊर्वरित 18 जागांबाबत आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष आणि आप या पक्षांबरोबर उद्यापासून चर्चा होईल, असे संजय राऊत म्हणाले. जागा वाटपाला विलंब झाल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, प्रत्येक पक्ष आपापली भूमिका घेऊन पुढे जात असतो पण महाविकास आघाडी एक आहे असे संजय राऊत म्हणाले.
समसमान
– महाविकास आघाडीतील चर्चेला मंगळवारपासून वेग आला. काँग्रेसने समन्वयाची जबाबदारी दिल्यानंतर विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रथम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
– थोरात यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी केलेली चर्चा यशस्वी ठरली. काही जागांवरून निर्माण झालेली गुंतागुंत या चर्चेतून सुटली.
– ही चर्चा आज पुढे सरकली. तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मॅरेथॉन चर्चा झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार या चर्चेत सहभागी झाले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही चर्चा झाली.
– महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांना समसमान जागा हे सूत्र या चर्चेअंती ठरले. त्यानंतर याबाबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List