वार्तापत्र मलबार हिल – शिवसेनेचे तगडे आव्हान, भाजपचा विजयरथ रोखणार
>> शिल्पा सुर्वे
दक्षिण मुंबईतील मलबार हिल मतदारसंघात यंदा शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. महायुतीचे मंगलप्रभात लोढा यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे भैरू चौधरी जैन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेली अनेक टर्म मंगलप्रभात लोढा या मतदारसंघातून निवडून येऊनही तेथील प्रश्न जैसे थे आहेत. पाणी, पुनर्विकास, पार्किंग यांसारख्या समस्यांवरून त्यांच्या विरोधात रोष आहे. अशातच महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे भैरू चौधरी जैन यांच्यासारखा दांडगा जनसंपर्क असलेला, सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला आणि जनमानसात चांगली प्रतिमा असलेला उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काटें की टक्कर होऊन बदल होईल असे चित्र आहे.
मलबार हिल हा दक्षिण मुंबईतील मध्यमवर्गीय व उच्चभूंचा, मराठी आणि जैन मारवाडींचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ. मतदारसंघात अंदाजे 1 लाख 20 हजार मराठी मतदार आहेत. मारवाडी-गुजराती मतदारसंख्या 70 ते 80 हजार तरी असेल, तर मुस्लिम मते 15 हजारांच्या आसपास आहेत. विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत दक्षिण मुंबईमधील ठाकूरद्वार, गिरगाव, ग्रॅण्ट रोड, ताडदेव आणि आसपासच्या परिसराचा समावेश असलेला ऑपेरा हाऊस मतदारसंघ काही वर्षांपूर्वी मलबार हिल मतदारसंघात विलीन झाला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर विधानसभेच्या 2009, 2014 व 2019 मधील निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भाजपचे मंगलप्रभात लोढा विजयी झाले.
समस्या जैसे थे
वर्षानुवर्षे मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असूनही नागरिकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. पाण्याची समस्या कायम आहे. अनेक इमारतींमध्ये, झोपडपट्टी भागांत जेमतेम अर्धा तासदेखील पाणी येत नाही. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. पार्ंकगसाठी जागा नाही. सर्वात मोठी समस्या म्हणजे पुनर्विकासाची समस्या. जुन्या इमारतींत राहणारे नागरिक पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. वर्षानुवर्षे त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकलेले नाही. या प्रश्नाकडे स्वतः बिल्डर असलेल्या विद्यमान आमदारांनी कायम दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी रहिवाशी करतात.
प्रश्नांची जाण
शिवसेनेचे उमेदवार भैरू चौधरी जैन हे सॉलिसीटर आहेत. वकिली पेशाच्या माध्यमातून त्यांची नाळ सामान्यांशी जुळलेली आहे. नागरिकांच्या समस्या, विशेष करून पुनर्विकासाचे प्रश्न कायदेशीररीत्या हाताळून कायमस्वरूपी सोडवले जावेत, असे त्यांचे व्हिजन आहे. त्यादृष्टीने गेली अनेक वर्षे ते समाजात कार्यरत आहेत आणि त्यांचा फायदा भैरू चौधरी जैन यांना निवडणुकीत होईल, असे म्हटले जातेय.
मराठी मते निर्णायक
एकेकाळी मलबार हिल मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर मराठी भाषिक मतदार होते. कालांतराने इथे अमराठी मतदारांची संख्याही वाढत गेली. असे असले तरी आजही मराठी मतदारांची मते निर्णायक ठरत आहेत. अमराठी मतांचे विभाजन आणि हक्काची मराठी मते मिळाल्यानंतर भैरू चौधरी (जैन) यांचा विजय होईल अशी चर्चा आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List