Assembly Election 2024 : कणकवली विधानसभा मतदारसंघात 6 उमेदवार मैदानात, कोण मारणार बाजी?
कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी 8 उमेदवारानी अर्ज दाखल केले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवस होता. यावेळी 2 अपक्षांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. यामध्ये प्रकाश दत्ताराम नारकर व विश्वनाथ बाबू कदम (पियाळी) यांचा समावेश आहे, अशी माहिती कणकवली विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.
दरम्यान, 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती.त्यामुदतीपर्यंत आठ उमेदवारांपैकी 2 अपक्षांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात 6 उमेदवार एकमेकासमोर मैदानात उभे राहिले आहेत. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकर व महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्यातच खरी लढत होणार आहे.
कणकवली विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी येथील तहसील कार्यालयात सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नामनिर्देशन पत्र माघारीची प्रक्रिया झाली. दुपारी 12.40 वाजण्याच्या सुमारास अपक्ष उमेदवार प्रकाश नारकर, विश्वनाथ कदम यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यावेळी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गटाचे)कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर उपस्थित होते.
आता कणकवली विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीच्या रिंगणात महायुतीच्यावतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नितेश नारायण राणे, महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संदेश भास्कर पारकर, अपक्ष संदेश सुदाम परकर, बंदेनवाज हुसेन खानी, गणेश अरविंद माने व बहुजन समाज पक्षाचे उमेदवार चंद्रकांत जाधव राहिले आहेत.
उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेच्यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, देवगड तहसीलदार लक्ष्मण कसेकर,वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील उपस्थित होते. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List