Video – ज्यांना आपण गद्दार म्हटलं ते मुख्यमंत्री झाले! ऐन निवडणुकीत भाजप नेत्याने फोडला बॉम्ब
महायुती एक आहे असा दावा महायुतीचे नेते करत असतात. पण भाजपच्या नेत्याने या दाव्यातील हवाच काढली आहेत. आपण ज्यांना गद्दार म्हटलं ते मुख्यमंत्री झाले अशा शब्दांत भाजपचे नेते रामचंदानी यांनी स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे. तसेच वेळ बदलते तसे राजकारण बदलतं असेही रामचंदानी म्हणाले.
उल्हासनगरमध्ये भाजपची एक बैठक होती. तेव्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी म्हणाले की, जामलूजी म्हणाले की काही गद्दारांनी जीवन हिंदानी यांना मत दिलं नाही म्हणून ते महापौर नाही झाले. त्यांना मी सांगू इच्छितो की, आता कोणीही गद्दार नाही. ज्यांना आपण गद्दार म्हणतो ते मुख्यमंत्री होतात. त्यामुळे राजकारणाचे परिदृश्य बदलले आहे. ज्यांना काल आपण गद्दार म्हणायचो ते आपल्या पक्षात सामील झाले आहेत आणि आपण त्यांना खुद्दार म्हणत आहोत. वेळ बदलली आहे असेही रामचंदानी म्हणाले.
आपण ज्यांना गद्दार म्हटलं ते मुख्यमंत्री झाले अशा शब्दांत भाजपचे नेते रामचंदानी यांनी स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे.
वाचा सविस्तर : https://t.co/xWr2Frk6Dt pic.twitter.com/AfhMV8LChj— Saamana (@SaamanaOnline) November 3, 2024
महायुतीचे दावे फोल
फक्त उल्हासनगरमध्येच नाही तर राज्यात अनेक ठिकाणी महायुतीतील वाद आणि बंडखोरी समोर आली आहे. माहीममध्ये भाजपने मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला आहे. तर मिंधे गटाचे सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे. तसेच एकनाथ शिंदे आपल्या उमेदवारा मागे ठामपणे उभे आहेत. दुसरीकडे भाजपने नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. पण अजित पवारांनी मलिक यांना एबी फॉर्म देऊन भाजपला तोंडघशी पाडलं होतं. आम्ही मलिक यांचा प्रचार करणार नाही अशी सारवासारव देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली. खुद्द भाजपमधली बंडखोरीही पक्षाला थांबवता आली नाही. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी करत बोरीवलीतून उमेदवारी अर्ज भरला आहे आणि आपल्या उमेदवारीवर ठाम उभे आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List