मिंध्यांना आणि अजित पवार गटाला उमेदवार मिळेना; भाजपने स्वतःचे उमेदवार घुसवले
निवडणुकीच्या काळात अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या घेत तिकीट मिळवण्यासाठी धडपड करतात. कोणत्याही पक्षात प्रवेश करत तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांचा द्राविडी प्राणायाम या काळात दिसून येतो. महायुतीमध्ये तिन्ही घटक याआधी जास्तीतजास्त जागा मिळवण्यासाठी संघर्ष करत होते.मात्र, आता भाजपकडून मिळालेल्या जागा लढवण्यासाठीही मिंधे गट आणि अजित पवार गट यांच्याकडे उमेदवारच नसल्याची परिस्थिती आहे. हीच संधी साधत भाजपने मिंघे गटात आणि अजित पवार यांच्या गटात आपल्या उमेदवारांना घुसवत त्यांना तिकीट मिळवून दिले आहे.
मिंधे आणि अजित पवार गटाला महायुतीत जास्त जागा तर जास्त हव्या होत्या, पण त्यांना निवडणूक लढण्यासाठी उमेदवारच मिळेत नाहीत. याचा फायाद घेत भाजपने या दोन गटांना आपल्या उमेदवारांचा पुरवठा केला. ज्या जागांवर भाजपने या गटांना उमेदवार दिले, त्यातील बहुतेक जागा भाजपला हव्या होत्या. मात्र, या जागा त्यांना मिंधे आणि अजित पवार गटाला सोडाव्या लागल्या. पण त्यांना उमेदवारच मिळत नसल्याने अखेर भाजपने त्यांचेच उमेदवार या जागांवर घुसवले. त्यामुळे अशा ना तशा प्रकारे या जागा भाजपच्याच पदरात पडल्या आहेत.
भाजपच्या प्रवक्त्या शायना एन.सी. यांनाही मिंध्यांनी मुंबादेवीतून उमेदवारी दिली. भाजपतून मिंधे गटात गेलेल्या अजित पिंगळे (धाराशिव), दिग्विजय बागल (करमाळा), अमोल खताळ (संगमनेर) आणि विठ्ठल लंघे (नेवासा) यांनाही शिंदेसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना यांनाही मिंघे गटाने कन्नडमधून उमेदवारी दिली आहे. निलेश राणेही भाजपमधून मिंधे गटात गेले, त्यांना कुडाळची उमेदवारी त्यांना मिळाली.
अंधेरी पूर्वच्या जागेसाठी मिंधे गट आग्रही होता. पण भाजपलाही ही जागा हवी होती. स्थानिक भाजप नेते मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याचेही ठरविले. मिंधे गटानेही त्यांनाच उमेदवार करण्याचे ठरवल्याने पटेल यांनी मिंधे गटात प्रवेश करत या जागेवरून उमेदवारी मिळवली. पालघरची जागा भाजपला हवी होती. मात्र, या जागेसाठी मिंध्यांना आग्रह धरला. येथेही दोघांचे उमेदवार एकच होते राजेंद्र गावित. उमेदवारी गावीत यांनी मिंधे गटात प्रवेश केला आणि उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेतली.
भाजपने नांदेड लोकसभेतील पराभूत उमेदवार माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अजित पवार यांच्या तंबूत पाठवत त्यांच्या गळ्यातही उमेदवारीची माळ घालून घेतली. सांगलीचे माजी भाजप खासदार संजयकाका पाटील अजित पवार गटाकडून रोहित पाटील (तासगाव कवठेमहांकाळ) यांच्याविरोधात लढणार आहेत. भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील अजित पवार गटात गेले आणि लगेच त्यांना इस्लामपूरची उमेदवारी मिळाली. माजी मंत्री आणि भाजपचे नेते राजकुमार बडोले यांनी अजित पवार गटात उडी घेतली आणि उमेदवारीची माळ त्यांच्याही गळ्यात पडली.
महायुतीत अशा प्रकारचे वातावरण असल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे. आधी जागांसाठी आग्रही राहत संघर्ष करत जागा मिळवायच्या आणि ऐनवेळी उमेदवारांची शोधाशोध करायची. पण उमेदवाराच मिळत नसल्याने भाजपकडून उेदवार आयात करायचे म्हणजे जागा मिळवली तरी ती भाजपच्याच नेत्याला मिळाली असे चित्र महायुतीत अनेक जागांवर दिसत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List