शेअर बाजार, सराफा बाजारात ‘दिवाळी’; शुभ मुहूर्तावर कोट्यवधींचा उलाढाल होण्याचा अंदाज
देशभरात सोमवारी वसुबारसपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हटले जाते. तसेच दिवाळीत धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याला मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यंदा शेअर बाजार, सराफा बाजारात दिवाळी साजरी होणार आहे. दिवाळीत अनेक शुभमुहूर्त येत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी होणार असल्याने सोन्या-चांदीची झळाळी वाढणार आहे. तर लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्त ट्रेडिंगपासून शेअर बाजारात तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिवाळी सणाला सुरुवात झाली असून मंगळवारी धनत्रयोदशीनिमित्ताने सोन्या-चांदीच्या वस्तू, दागिने यांच्या खरेदी-विक्रीला वेग आला आहे. तसेच यंदा मोठ्या प्रमाणात सोने-चांदी, दागिने अलंकार यांची खरेदी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्याने जुने सोने देत नवे सोने घेण्याकडे अनेकांचा कल आहे. तसेच गुंतवणूक म्हणून अनेकजण सोन्या-चांदीची नाणी घेत असल्याने सराफा बाजारात तेजी येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सोने-चांदी, दागिने, अलंकार यांच्या खरेदीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दिवाळीत अडीच हजार कोटींपर्यंत सराफा बाजाराची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आगामी काळात सुरू होणाला लग्नसराईचा काळामुळे अनेकजण आतापासूनच खरेदी करत आहेत. जागतिक बाजारातील अस्थिर वातावरणामुळे अनेकजण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने चांदीची नाणी घेत आहेत. तसेच दिवाळीत धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडव्यानिमित्त अनेकजण सोन्या- चांदीच खरेदी करतात. तसेच पाडव्याला बायोका आणि भाऊबीजेला बहिणीला भेट देण्यासाठीही सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी होत असल्याने सराफा बाजारात झगमगाट दिसत आहे.
जागतिक अस्थिर वातावरणामुळे जागातिक शेअर बाजारावर मंदीचे सावट आहे. मात्र, हिंदुस्थानची अर्थव्यवस्था स्थिर आहे. तसेच परदेशी गुंतवणूकदार हिंदुस्थानातील शेअर बाजारात गुंतवणूक करत असल्याने राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तापासून तेजी दिसण्याची शक्यता आहे. मागच्या आठवड्यात बाजारात मोठी घसरण झाली होती. मात्र, या आठवड्यात सोमवारी बाजार सुरू होताच पुन्हा जबरदस्त तेजी दिसून आली आहे. त्यामुळे शेअर बाजाराची घोडदौड सुरू होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List