अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची रुग्णवाहिकेतून अमली पदार्थांची तस्करी; 42 प्लास्टिकच्या पिशव्यांतून 9 क्विंटल दोडाचुरा आणला
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अजित पवार गटाच्या रायगडातील कार्यकर्त्यांचा एक वेगळाच कारनामा उघडकीस आला आहे. तळा येथील या दोन कार्यकर्त्यांनी चक्क रुग्णवाहिकेतून मध्य प्रदेशमधील रतलाम येथून अमली पदार्थ आणल्याचे समोर आले आहे. तब्बल 42 प्लास्टिकच्या पिशव्यांतून 9 क्विंटल दोडाचुऱ्याची ही तस्करी करण्यात येत होती. मध्य प्रदेश पोलिसांनी नाकाबंदी करून या दोघांना ताब्यात घेतले असून जप्त केलेल्या रुग्णवाहिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालकल्याण विकासमंत्री अदिती तटकरे यांची छायाचित्रे असल्याने खळबळ उडाली आहे. रणजित मोडके व रुपेश माने अशी आरोपींची नावे आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने तळा तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी एक खासगी रुग्णवाहिका दिली आहे. या अॅम्ब्युलन्सवर रणजित मोडके हा चालक असून त्याची पत्नी राष्ट्रवादी अजित पवार गटाची सरपंच होती. रणजित व त्याचा साथीदार रुपेश हा मध्य प्रदेशातून दोडाचुरा नावाच्या अमली पदार्थाची महाराष्ट्रात तस्करी करत होते. याबाबत खबऱ्यांकडून माहिती मिळताच पोलिसांनी मध्य प्रदेशातील सेजावता फते याठिकाणी सापळा रचून या रुग्णवाहिकेची झाडाझडती घेतली. यावेळी अॅम्ब्युलन्समध्ये ४२ प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भुसा भरल्याचे आढळून आले. अधिक चौकशी केली असता हा भुसा दोडाचुरा नावाच्या अमली पदार्थाचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मी तर फक्त चालक आहे
पोलिसांनी रणजित व रुपेशला ताब्यात घेत त्यांना पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर पोपटासारखे बोलू लागलेल्या दोघांनी आपण यापूर्वीदेखील दोडाचुऱ्याची पाच ते सहा वेळा तस्करी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक अमितकुमार यांनी दिली. दरम्यान रणजितने आपण चालक असून आपल्याला फार काही माहीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे नेमके हे दोघेजण कुणासाठी काम करत आहेत. तसेच हे अमली पदार्थ मध्य प्रदेशातून महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागात नेण्यात येत होते याचा तपास सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List