भाजपने दिला चार विद्यमान आमदारांना नारळ, फडणवीसांचे पीए वानखेडेंना उमेदवारी
भाजपने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान आमदार सुनील राणे, दादाराव केचे, विकास कुंभारे आणि डॉ. संदीप धुर्वे या चार आमदारांना नारळ दिला आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना आर्वीमधून उमेदवारी दिली आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने डॉ. संतूक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
बोरिवलीतील विद्यमान आमदार सुनील राणे यांना उमेदवारी नाकारत त्यांच्या जागी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे; पण संजय उपाध्याय यांच्या उमेदवारीला गोपाळ शेट्टी यांनी विरोध केला आहे. घाटकोपर पूर्वमधून माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी उमेदवारी मागितली होती; पण त्यांची मागणी फेटाळून आमदार पराग शहा यांना पुन्हा उमेदवारी दिली.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधाला न जुमानता अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी दिली. यवतमाळच्या अर्णीतून डॉ. संदीप धुर्वे यांना तिकीट नाकारून माजी आमदार राजू तोडसाम यांना तर नागपूर मध्य मतदारसंघातून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना उमेदवारी नाकारून येथे प्रवीण दटके यांना संधी देण्यात आली आहे.
फडणवीसांचे पीए व्हा, आमदारकी मिळवा
2019च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी आपले तत्कालीन पीए अभिमन्यू पवार यांना लातूर जिह्यातील औसामधून उमेदवारी देऊन निवडून आणले होते. आता पीए सुमित वानखेडे यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे फडणवीस यांचे पीए बना आणि विधानसभेचे तिकीट घ्या, अशी चर्चा सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List