Jemimah Rodrigues – वडिलांवर धर्मपरिवर्तनाचा आरोप; टीम इंडियाच्या खेळाडूचं सदस्यत्व खार जिमखाना क्लबनं केलं रद्द
टीम इंडियाची स्टार खेळाडू आणि नुकतीच टी-20 वर्ल्डकपमध्ये प्रतिनिध्व केलेली जेमिमा रॉड्रिग्ज एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. मुंबईतील ऐतिहासिक खार जिमखाना क्लबने तिचे सदस्यत्व तडकाफडकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जेमिमाच्या वडिलांनी तिला मिळालेल्या सदस्यत्वाचा वापर करून क्लबच्या इमारतीमध्ये ‘धार्मिक कृत्य’ केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त ‘फ्री प्रेस‘ने दिले आहे.
वृत्तानुसार, जेमिमा हिचे वडील इव्हान रॉड्रिग्ज हे खार खिमखाना क्लबच्या परिसराचा वापर अनधिकृत धार्मिक कार्यासाठी करत होते आणि काही सदस्यांनी यावर आक्षेप घेत तक्रार केली होती. जेमिमाच्या वडिलांवर धर्मपरिवर्तनाचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे 20 ऑक्टोबर 2024 रोजी क्लबच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जेमिमाचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खार जिमखाना क्लबमध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्य किंवा मेळावे करण्यास मनाई आहे. मात्र जेमिमाच्या वडिलांनी क्लबच्या अध्यक्षीय सभागृहामध्ये दीड वर्षाच्या काळात जवळपास 35 धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. इव्हान रॉड्रिग्ज हे ब्रदर मॅन्युएल मिनिस्ट्रीज या संस्थेशी संलग्न होते आणि त्या अंतर्गत त्यांनी हे कार्यक्रम आयोजित केले होते. हे क्लबच्या नियमांचे उल्लंघन असून या कार्यक्रमाचा उद्देश धर्मपरिवर्तन करणे हा होता. यामुळे क्लबच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली.
याच संदर्भात क्लबच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य शिव मल्होत्रा यांनी सांगितले की, आम्ही देशभरामध्ये धर्मांतराबद्दल ऐकले असून इथे आमच्या नाकाखाली हा प्रकार सुरू होता. खार जिमखाना क्लबच्या घटनेच्या नियम 4ए नुसार क्लबच्या आवारामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली जात नाही. मात्र एका कर्मचाऱ्याने क्लबमध्ये सुरू असलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली.
क्लबचे माजी अध्यक्ष नितीन गाडेकर यांनीही याबाबत माहिती देताना सांगितले की, मी, मल्होत्रा आणि इतर काही सदस्यांनी एका सत्राला भेट दिली तेव्हा खोलीमध्ये अंधार होता. धार्मिक भाषणांसह तिथे ट्रान्स संगीत वाजत होते. एक महिला ‘तो आम्हाला वाचवायला येत आहे’, असे म्हणत होती. क्लबच्या इमारतीमध्ये अशा कार्यक्रमाला परवानगी कशी दिली याचे मला आश्चर्य वाटले. त्यामुळे आम्ही जेमिमाचे मानद सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला. खार जिमखाना क्लबचे अध्यक्ष विवेक देवनाना यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 2023 मध्ये तिला 3 वर्षांसाठी हे सदस्यत्व देण्यात आले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List