जो कोणी मोदी शहांच्या पालख्या वाहतोय तो महाराष्ट्राचा दुष्मन, कोल्हापुरातून उद्धव ठाकरे गरजले

जो कोणी मोदी शहांच्या पालख्या वाहतोय तो महाराष्ट्राचा दुष्मन, कोल्हापुरातून उद्धव ठाकरे गरजले

मिंध्यांनी ही गद्दारी फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी नाही केली, तर महाराष्ट्रासोबत ही गद्दारी त्यांनी केलेली आहे असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात केला. तसेच जो कोणी मोदी शहांच्या पालख्या वाहतोय तो महाराष्ट्राचा दुष्मन असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

कोल्हापुरात सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आताची ही लढाई ही महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही यांची आहे. सर्व महाराष्ट्र प्रेमी हे महाविकास आघाडीसोबत आहेत. आणि मी लढायला मैदानात उतरलोय. कोल्हापुरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करतोय. राधानगरी मतदारसंघ गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही. मधल्या काळात ग्रहण लागलं, त्यासाठी मी जोडून माफी मागतोय. ती चूक माझ्याकडून झाली. ज्याला सगळंकाही दिलं. त्यांनी गद्दारी केली. आता माझ्याच नव्हे तर जनतेच्याही पाठीत वार करून छातीतही वार करायला आपल्यासमोर उभे राहिले आहेत. सगळं देऊनसुद्धा शिवसेना नावाच्या आईवर वार करणारा तुमचा माणूस होऊ शकतो का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

तुमच्या मनात जो राग आहे तो राग आपल्या हृदयात धगधगत ठेवला होता. कधी एकदा वेळ येते आणि या खोके सरकारला आपण जाळून भस्म करतोय याची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता. न्यायालयाकडून अजूनही आपल्याला न्याय मिळालेला नाही. न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढलेली आहे. पण त्या न्यायदेवतेला आपल्या देशातली लोकशाही मरते आहे हे अजून दिसलेले नाही. म्हणून मी तुमच्या दरबारात आलो आहे. मी माझ्यासाठी लढत नसून महाराष्ट्रासाठी लढतोय. नाहीतर मी सुद्धा त्यांच्यासोबत गेलो असतो. त्यांना जर 50 खोके दिले होते, मी संपूर्ण शिवसेना घेऊन गेलो असतो तर काय झालं असतं. त्यांची गोदामं कमी पडली असती. पण ही गद्दारी माझ्या रक्तात नाही. हा हरामखोरपणा माझ्या रक्तात नाही. माझ्या महाराष्ट्राला गुलाम बनवून विकणाऱ्यातला मी नाहिये असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

इथलं पाणी अदानीला विकलं गेलंय. मला वाटलं फक्त मुंबईतली धारावीची जमीन विकली आहे, पण चंद्रपुरातली शाळाही अदानींना दिली. संपूर्ण महाराष्ट्र हा काय जणू अदानीला विकला जातोय. आम्ही काय षढं आणि नामर्द म्हणून हे बघत बसणार?

सगळे समाज तोडून, फोडून टाकलेले आहेत. एक तर निवडणूक आल्यावर हिंदू मुस्लीम करायचंय. हिंदूंमध्ये, मराठी माणसांमध्ये भेदभाव करायचा. तोडायचं, फोडायचं तुम्ही मेलात तरी चालेल पण मला सत्ता मिळली पाहिजे ही भाजपची नीती आहे. आणि यात आपण त्यांना मदत करायची? गेल्या वेळी आपण ज्यांना निवडून दिलं ते लाचार झाले, याचा अर्थ असा नाही की राधानगरीकर लाचार होतील. जो कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या महारष्ट्र विकणाऱ्यांना मदत करेल तो महाराष्ट्राचा शत्रू. जो कोणी अदानीला मदत करतोय, जो कोणी भाजपला मदत करतोय, जो कोणी मोदी शहांच्या पालख्या वाहतोय तो महाराष्ट्राचा दुष्मन आहे हे मी जाहीरपणे सांगतोय.

गेली अडीच वर्ष जे आपण भोगतोय ते व्यक्त करायला मी आलोय. फक्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करायचे म्हणून घाई गडबडीत तो पुतळा उभारण्यात आला. आणि आठ महिन्यांच्या आत आमच्या दैवताचा पुतळा कोलमडून पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ही तुमची भक्ती?

सरकार म्हणून जाऊ तिथे खाऊ. हे सरकार टक्केवारीचं सरकार आहे खोके सरकार आहे. जिथे मिळेल तिथे खात सुटलेत. सुविधांच्या नावाखाली निविदा काढायच्या कंत्राटदाराचे खिसे भरायचे. आपलं सरकार असताना पुण्यातल्या रिंग रोडची संकल्पना आपण मंजूर केली होती. मला माहिती मिळाली आहे की ज्या रकमेत तो प्रकल्प आपण मंजूर केला होता त्यात कित्येक पटीने वाढ करून तो प्रकल्प आता मंजूर करण्यात आला आहे.

निवडणूक आल्यानंतर तुम्हाल बहीण दिसली? बदलापूरमध्ये एका बालिकेवर अत्याचार झाला. बदलापूरमध्ये तुमचे निर्ढावलेल्या पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. कोणत्या तोंडाने त्या बालिकेच्या आईला लाडकी बहीण योजनेचे पैसे देणार आहात? चार वर्षांच्या मुलीचं आयुष्य बरबाद करून टाकलं.

या योजनेमुळे कुणाचं घर चालत असेल तर असं जर कुणी हात वर करून सांगत असेल तर आम्ही महायुतीविरोधात निवडणूकच लढवणार नाही. कारण सगळी घरं खुश आहेत. या योजनेमुळे एकाचं घर तरी समाधानी आहेत. ही योजना राबवत आहात त्यापुढे जी महागाई वाढत आहे ती महागाई रोखता येत नाहीये.

एका बाजूला कंत्राटदारांच्या माध्यमातून पैसे खायचे, आणि दुसरीकडे महागाई वाढवायची, तिसऱ्या बाजूने महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर सोडायची. राज्य विकून टाकायचं, गुजरातला सगळं विकून टाकायचं. महाराजांचा पुतळा उभा केला, त्या पुतळ्याच्या बांधकामातही पैसे खाणारी ही औलाद छत्रपतींचा महाराष्ट्र पुढे नेतील का ?

कोश्यारी म्हणून राज्यपाल होते. त्यांच्याविरोधात आपण मोर्चा काढला होता. कारण त्यांनीही शिवरायांचा अपमान केला, त्याचा निषेध ना भाजपने केला ना मिंधेंनी केला. आपण मोर्चा काढला. मोदींनी त्यांना नाही हटवलं. कोश्यारींनी महाराजांचा अपमान केला माझा तर अपमान नाही ना केला अशी भुमिका मोदींनी घेतली होती. महाराजांच्या पुतळ्यात पैसे खाणारे तुम्ही, महाराजांचा अपमान करणारे तुम्ही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचे सरकार येणार म्हणजे येणारच. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही फक्त महाराजांचे पुतळे नाही उभारणार महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आम्ही महाराजांचे भव्य. मंदिर उभारणार. जसं प्रभू श्री रामाबद्दल आम्ही जय श्रीराम आम्ही म्हणतो. तसं आम्ही जय शिवराय हा आमच्या महाराष्ट्राचा जयघोष असेल.

लोकसभा निवडणुकीत आपले मशाल गीत होतं. त्या गीतातलं जय भवानी जय शिवाजी काढण्याची आमच्यावर जबरदस्ती करत होते. तेव्हा मी सांगितलं होतं काढणार नाही, धमक असेल तर जी कारवाई करायची आहे ती करा. मी वाट बघतोय तुम्ही माझ्यावर कारवाई करा महाराष्ट्र तुमच्यावर कारवाई करेल.

सूरतमध्येही शिवाजी महाराजांचे मंदिर बांधून दाखवेन. ज्या महाराजांनी सूरत लुटली त्याच सुरतेला गद्दार घेऊन गेलात. त्याच सूरतेत मी माझ्या महाराजाचे मंदिर बांधून दाखवेन. 50 खोके घेऊन तुम्हाला वाटलं की महाराष्ट्र विकत घेऊ शकता तुम्ही? जे गद्दार घेतले तुम्ही ते म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र म्हणजे खुप मोठा आहे अखंड आहे. तु्म्ही कितीही जन्म घेतले तरीही माझा महाराष्ट्र तुमच्या खोक्यात सामावणार नाही.

जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवले होते. महागाई वाढू दिली नव्हती. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल तेव्हा डाळ, तांदुळ, तेल यांचे भाव आम्ही स्थिर ठेवून दाखवणार. सरकार पण स्थिर जीवनावश्यक वस्तूंचेही दर स्थिर.

मी गुजरातच्या विरोधात नाही, गुजराती लोकांविरोधात नाही. अनेक गुजराती इथे राहतात, मुंबईत राहतात. कुठेही मराठी-गुजराती वाद झाला नाही आणि होऊ देणार नाही. पण महाराष्ट्रातल्या हक्कांचं आहे, माझ्या जनतेच्या तोंडातला घास ओरबाडून देणार असाल तर ते मी होऊ देणार नाही.

अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो. माझं सरकार फक्त यासाठी पाडलं कारण महाराष्ट्राचं वाकडं त्यांना मी करू देत नव्हतो. एक सुद्धा उद्योग मी महाराष्ट्रातून बाहेर जाऊ दिला नव्हता. कोणीही आलं असतं तर महाराष्ट्राच्या हक्काचा एक कणही दिला नव्हता, एवढा दरारा दिल्लीत मी निर्माण केला होता. त्यामुळे त्यांनी आपलं सरकार पाडलं. त्यांनी ही गद्दारी फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी नाही केली. तर महाराष्ट्रासोबत ही गद्दारी त्यांनी केलेली आहे. कारण त्यांना हा महाराष्ट्र लुटून न्यायचा आहे, म्हणून त्यांनी ही गद्दारी केली आणि लाचार, चेले चपाट्यांना मुख्यमंत्री केलं.

आज मुख्यमंत्री म्हणून जे बाहुलं बसवलंय ते ओरिजनल कुणाचा माणूस आहे. शिवसेनेचा माणूस आहे. दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष हे शिवसेनेचे आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शिवसेनेचे आहेत. सगळी शिवसेना तिथे बसली आहे तर तुम्हाला उद्धव ठाकरेंचं काय वावडं आहे? तुम्हाला शिवसेनेशिवाय राज्य करता येत नाही ही आजची भाजपची परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांपासून, विरोधी पक्षनेते आणि दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष सगळे शिवसेनेचे आहेत. पण शिवसेना नकोय, उद्धव ठाकरे नकोय. तुम्ही उपाशी राहिलात तरी चालेल पण मी महाराष्ट्र अदानींच्या घशात घालणार ही भाजपची नीती आहे.

ही निवडणूक महाराष्ट्राची ओळख ठरवणारी निवडणूक आहे. महाराष्ट्र कुणाचा महाराष्ट्रा शिवाजी महाराज, शाहु फुले, आंबेडकरांचा की मोदी शहांचा ही ओळख ठरवणारा ही निवडणूक आहे. एक भाऊ आला तर ठीक आहे, पण तीन तीन भाऊ येत आहेत. एका बाजूला देवा भाऊ, दुसऱ्या बाजूला दाढी भाऊ, तिसऱ्या बाजूला जॅकेट भाऊ. मग तुमचा भाऊ कोणता? हे भाऊ वगैरे काही नाही हे जाऊ तिथे खाऊ आहेत.

आज राज्यांना मुलींना सरकारी शाळेत शिक्षण मोफत आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर राज्यातल्या मुलांनाही आम्ही मोफत शिक्षण देणार. मुलं मुली हे दोन्ही आपले आधारस्तंभ आहेत, भविष्य आहे. महाराष्ट्रात पोलिसांची अनेक पदं रिक्त आहेत. महिला पोलिसांची पदं रिक्त असताना महिलांचं सरंक्षण कोण करणार? महिला पोलिसांची भरती करणार आणि महिला शिपायापासून ते महिला अधिकाऱ्यांपर्यंत सर्व कर्मचारी महिला असे पोलीस स्थानक सुरू करणार. मुंबईच्या धारावीतला अदानी प्रकल्प रद्द करू आणि धारावीकरांना तिथल्या तिथे घरं आम्ही देणारच. मुंबईत भुमीपत्रांना परवडेल अशा किंमतीत घर देणार. मुंबईत या मुंबई ही मराठी माणसांची आहे, मुंबई मी अदानीच्या घशात घालू देणार नाही. शेतकऱ्यांना हमखास हमीभाव देणार. गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर कदाचित तुम्हाला परत कर्जमुक्त करून दाखवलं असतं. तुमची साथ असताना मी कुठल्याही आव्हानाला घाबरत नाही. उलट मोठं आव्हान आलंच पाहिजे.

कोल्हापुरातून मी मोदी आणि शहांना विनंती करतोय की, तुम्ही पुढील 15 दिवस महाराष्ट्रात येऊन राहा. आणि जाताना तुमच्या पराभवाचे कडुनिंब घेऊन जा. सगळ्या नेत्यांना घेऊन या, सगळ्यांना मी छत्रपती महाराजांचा महाराष्ट्र कसा पाणी पाजतोय हे संपूर्ण जगाला कळूद्या.

त्यांनी घोषणा दिली होती की बटेंगे तो कटेंगे. त्यावर मी घोषणा देतोय की आम्ही तुटू देणार नाही, आम्ही लुटू देणार नाही. आम्ही यांना तोडायला देणार नाही आणि आम्ही यांना लुटायला देणार नाही. कारण आमचा महाराष्ट्र आहे, मशाल धगधगणार खोके वाले जळून भस्म होणार असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या