संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक
केंद्रीय निवडणूक आयोगाने वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. वर्मा हे 1990 च्या तुकडीचे वरिष्ठ अधिकारी असून सध्या कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते. ते एप्रिल 2028 मध्ये निवृत्त होणार आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून तत्काळ हटविण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी दिले होते. त्यांच्याकडील कार्यभार सेवाज्येष्ठतेनुसार मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे देण्यात आला होता. तसेच पोलीस महासंचालक पदासाठी महाराष्ट्र केडरमधील तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते.
राज्याच्या मुख्य सचिवांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदासाठी सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा, संजीव कुमार सिंघल आणि त्यांचा बॅचमेट रितेश कुमार या तीन अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार संजय वर्मा यांची महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्या नियुक्तीसंदर्भात तात्पुरत्या शब्दावर काँग्रेसचा आक्षेप
राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नियुक्ती संदर्भात काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारने संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती पोलिस महासंचालक पदी तात्पुरती दाखवली आहे. मात्र निवडणूक आयोगाने तात्पुरती नियुक्ती करा असे आदेश दिलेले नसल्याचं सांगत या नियुक्तीवरून काँग्रेस पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. काँग्रेसच्या तक्रारीवरून दोन दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिले होते.
n संजय वर्मा हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून ते 1990च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे तीन दशकाहून अधिक काळ पोलीस सेवेत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
n संजय वर्मा हे न्यायवैद्यक विज्ञानातील त्यांच्या कौशल्यांसाठी ओळखले जातात. कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी न्यायवैद्यक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. गुन्हा घडल्याच्या ठिकाणाचा तपास आणि तिथून पुरावे गोळा करण्यासाठी त्यांनी राज्यात जवळपास दोन हजारांहून अधिक तज्ञांचा चमू तयार केला आहे. त्यांच्या कार्याबद्दल अनेकदा त्यांचे कौतुकही करण्यात आले.
पोलीस दल निष्पक्षपणे काम करेल
संजय वर्मा यांनी संध्याकाळी पदभार स्वीकारला. राज्यातील निवडणूक मुक्त वातावरण आणि निष्पक्षपणे पार पाडणे ही आमची प्राथमिकता आहे. राज्यातील पोलिसांकडून निवडणूक प्रक्रिया संपूर्णतः निष्पक्ष पद्धतीने व भयमुक्तपणे होण्याच्या दृष्टीने कर्तव्य बजावले जाईल, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List