ठसा – श्याम मोकाशी
>> दिलीप जोशी
आम्हा काही पत्रकार मित्रांचा गोतावळा सहकुटुंब लोणावळय़ाला जायचा आणि ‘गोपाल पुंज’ या श्याम मोकाशी यांच्या बंगल्यात डेरा टाकायचा तेव्हाची गोष्ट. 1977 पासून असं अनेकदा झालं. इतपं की, श्यामचं ते घर आम्हाला आपलंच वाटायला लागलं. या ‘आपलेपणा’चं अधिक श्रेय खरं तर श्यामपत्नी श्रियाचं. ती उत्तम सुगरण गृहिणीची भूमिका सहजतेने पार पाडायची. श्याम तसा अलिप्तच. त्याच्या चेहऱयावरचे भाव वाचता येणे कठीण. सतत स्थितप्रज्ञासारखा आविर्भाव आणि तो मुद्दाम आणलेला वगैरे नव्हे. ऐहिक पिंवा बौद्धिक मिरासदारी मिरवणारे अनेक असतात. श्यामकडे पाहिलं तर यापैकी कशाचा थांग लागायचा नाही. ‘लोणावळय़ाला आपण श्याम्याच्या बंगल्यावर जातोय’ असं सोपारकरांकडून पहिल्यांदा ऐकलं तेव्हा लोणावळय़ासारख्या थंड हवेच्या ठिकाणी बंगला असलेल्या सुखवस्तू माणसाचं चित्र मनात उमटलं.
प्रत्यक्ष दर्शनात बंगल्याचे हे मालक पट्टय़ापट्टय़ाचा लेंगा आणि मळलेला बनियान अशा वेशात आवारातल्या विटा इकडून-तिकडे नेण्याच्या लगबगीत दिसले. सोपारकर म्हणाले, ‘हा श्याम!’ त्याने माझ्याकडे ‘ब्लॅन्क’ नजरेने क्षणभर पाहिलं. मग चेहऱयावर सूक्ष्मशी स्मितरेषा उमटली आणि एकच शब्द कानी आला ‘बरं!’ मालक पुन्हा आपुल्या कामी रुजू झाले! थोडय़ाच दिवसांत श्यामच्या या अलिप्तपणातील सौहार्द जाणवायला लागलं.
एरवी तसे मितभाषी, शांत वगैरे असलेले श्याम मोकाशी तत्त्वाच्या बाबतीत ठाम आणि चिवट. आमच्या ‘मैत्रीपूर्ण’ गप्पा केवळ मतभेदांवरच आधारित असायच्या. त्यात राजकीय, सामाजिक, देशी, विदेशी असे असंख्य विषय यायचे. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रातला जाणकार. अभ्यासपूर्ण बोलणारा. तिथे इतरही (पुढे नावाजलेली) मंडळी भरपूर यायची. आमच्या गप्पात सामील व्हायची. श्याम नेहमीच्या लगबगीनेच. इकडे-तिकडे हिंडताना आमच्या ‘चर्चासत्रां’कडे कान देऊन कसा असायचा हे त्याने मधेच थांबून आणि मौनव्रत सोडून केलेल्या दहा-पंधरा मिनिटांच्या विवेचनावरून लक्षात यायचं. यासाठी तुला (म्हणजे मुद्दा मांडणाऱयाला) आणखी कोणती पुस्तपं वाचायला हवीत याची यादीच धडाधड सादर करायचा आणि रेडिओवरच ‘टॉक’ संपल्यासारखा ‘स्वीच ऑफ’ होऊन निघून जायचा!
या मंडळींमध्ये अवघ्या विसाव्या वर्षी सामील झालेल्या मला एकाच वेळी अनेकांकडून अनेक विषयांवरची सखोल अभ्यासपूर्ण माहिती आणि मतं समजायची. त्या बोलण्यातलं बरंच लक्षात राहायचं. मग ते पडताळून पाहण्याचा नाद लागल्यावर वाचन व्हायचं आणि असहमती असेल तिथे स्पष्टपणे सांगण्यात संकोच नसायचा. या ‘स्पष्टते’ला आमच्यात वयाचं बंधन नव्हतं.
अलीकडेच श्याम गेला तेव्हा तो पंच्याऐंशी वर्षांचा होता. माझ्यापेक्षा चौदा वर्षांनी मोठा, पण आमचं नातं ‘अरे-तुरे’च्या मित्रत्वाचं. श्यामने मला अनेक पुस्तकांचे वाचन करायला सांगितले. सुसंगत वाचनाची पद्धत कशी असावी याचेही नकळत धडे दिले. हे सगळे तो मनापासून करायचा. पुन्हा ‘माझंच म्हणणं बरोबर आणि तेच तू स्वीकार’ असा अट्टाहास बिलकूल नसायचा. बऱयाचदा त्यातून वादच व्हायचे. ते त्याला आवडायचे. तो क्वचित चिडायचा आणि आणखीच मुद्देसूद, पण आवेशाने बोलत राहायचा.
‘केसरी’पासून ‘मराठी ब्लिट्स’ ते ‘श्री’ आणि शेवटी ‘मार्मिक’ अशा अनेक नियतकालिकांमधील त्याची पत्रकारिता. त्याच्या उमेदीच्या काळातल्या लेखांवर राजकीय वर्तुळात चर्चाही व्हायची, पण ‘रिटायर’ होईपर्यंत एकाच जागी टिकून राहाणं असा श्यामचाच काय आमचा कोणाचाच पिंड नव्हता. मध्येच श्यामला एखादं साप्ताहिक वगैरे काढायची लहर यायची. आर्टिस्टपासून लेखनापर्यंत आणि छपाईनंतर गठ्ठे वाहण्यापर्यंत एकच कर्मचारी! त्याचं नाव श्याम मोकाशी. त्याच्या या आतबट्टय़ाच्या उद्योगात सोपारकर त्याला मनोभावे मदत करायचे. त्यांनी ‘मावळ मित्र’ नावाचं एक अल्पायुषी (अ)नियतकालिक काढलं. हा त्यांचा ‘मित्र’ (सूर्य) कधी उगवला नि मावळला कुणाला कळलंच नसावं. तरीही नवं साहस करण्याची श्यामची उमेद कायम असायची. अगदी अखेरपर्यंत.
अशा आमच्या या मनस्वी, सहृदय मित्राला उत्तम साथ देणारी श्रिया त्याच्या संसाराची सारथी. परेश आणि महेश ही दोन्ही मुलं कर्तृत्वान झालेली पाहण्याचं भाग्य या दांपत्याला लाभलं. महेश यशस्वी डॉक्टर, तर परेश जागतिक कीर्तीचा सिनेदिग्दर्शक झाला. त्याचं लेखन, अभिनय, दिग्दर्शन या सगळय़ाच गोष्टींचं श्यामला निःशब्द कौतुक. त्याला एकदा म्हटलं, ‘परेशची बहुतेक नाटपं आणि सिनेमे मी आवर्जून पाहिलेत. छान आहेत.’ या वाक्यावर त्याच्या चेहऱयावर प्रसन्नता पसरली. माझ्याकडे पहिल्या भेटीत पाहिलं होतं तसंच क्षणभर रोखून पाहत तो बोलला ‘बरं!’ बस्स. त्याच्या या मितभाषीपणातील कौतुकात श्रिया, परेश, महेश आणि घरचाच झालेला पेरेझ अशा सर्व कुटुंबीयांविषयी सार्थ अभिमानाची भावना मात्र असायची.
दोन-अडीच महिन्यांपूर्वी त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा तो आजारीच होता. ‘संध्याछाया’ गडद होऊ लागल्याचं जाणवत होतं आणि अखेरीस आमचा हा विद्वान, सहृदयी मित्र निघून गेला. त्याला आदरांजली वाहताना ओलावलेल्या डोळय़ांत अनेक स्मृती तरळत आहेत. तो आता आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List