महाराष्ट्र तुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही! अंबामातेचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी फुंकले रणशिंग

महाराष्ट्र तुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही! अंबामातेचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी फुंकले रणशिंग

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबामातेचे दर्शन घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. राधानगरी रत्नागिरीत महाविकास आघाडीच्या विराट सभा झाल्या. यावेळी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मिंधे सरकारवर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. महागाईपासून फसव्या योजनांपर्यंत, भ्रष्टाचारापासून बेरोजगारीपर्यंत, महिलांवरील वाढत्या अत्याचारांपासून अदानीपर्यंत विविध मुद्दय़ांवरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा ठाकरी शैलीत समाचार घेतला. महाराष्ट्र तुटू देणार नाही, लुटू देणार नाही! मशाल धगधगणार, खोकेवाले भस्म होणार!! असा जोरदार इशारा त्यांनी दिला. मोदीशहादेशभरातील नेते घेऊन पुढचे पंधरा दिवस महाराष्ट्रात या आणि पराभवाचे कडुनिंब घेऊन परत जा, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले. सत्ता आल्यानंतर डाळीपासून साखरेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार, मुलींसोबत मुलांनाही मोफत शिक्षण देणार, भूमिपुत्रांना मुंबईत स्वस्त घरे उपलब्ध करणार, महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणी उभारणार, अशा घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केल्या.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. प्रचाराचा धुरळा उडाला आहे. राधानगरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची विराट सभा झाली. यावेळी जबरदस्त टोलेबाजी करत त्यांनी कोल्हापूरकरांची मने जिंकली. उपस्थितांमधील उत्साह आणि जोश पाहून राधानगरी मतदारसंघ गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

आपण इथे नन्नाचा पाढा वाचायला आलो नाही. अडीच वर्षे भोगतोय ते व्यक्त करायला आलोय, असे सांगतानाच उद्धव ठाकरे खोके सरकारवर तुटून पडले. ते म्हणाले की, खोके सरकार जिथे मिळेल तिथे खात आहे. रस्त्यातही खात आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना पुण्याच्या रिंगरोडची संकल्पना आपण आणली होती. आपल्या सरकारने ज्या रकमेला मंजुरी दिली त्यापेक्षा कितीतरी पटीने रक्कम मिंधे सरकारने मंजूर केली, असे सांगत मिंधे सरकारच्या भ्रष्ट कारभारावर उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

‘लाडकी बहीण’ योजनेवरूनही उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र डागले. निवडणूक आल्यावरच बहीण दिसते का, असा खोचक सवाल त्यांनी केला. बदलापुरात चिमुरडीवर अत्याचार झाल्यावर तिची तक्रार पोलीस घेत नाहीत. तिच्या आईसमोर जाण्याची मिंध्यांची हिंमत आहे का? तिला कोणत्या तोंडाने लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देणार आहात? जाणार तिकडे. देणार त्या मातेला 1500 रुपये, अशा सवालांची सरबत्ती उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांवर केली. लाडकी बहीण योजनेने घर चालणार असेल असे एकाने जरी सांगितले तर आम्ही महाविकास आघाडीला सांगू एकही उमेदवार देऊ नका, महिला खूश आहेत. पण राज्यात महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. राज्य विकायचं मिंध्यांनी ठरवलेय, महागाई वाढवली जात आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांपासून दोन्ही सभागृहांचे सभापती ओरिजनल शिवसेनेचे, मग ठाकरेंचे वावडे का?

गद्दाराला मुख्यमंत्री म्हणून बसवले. मुख्यमंत्री ओरिजनल शिवसेनेचा, दोन्ही सभागृहांचे सभापती ओरिजिनल शिवसेनेचे, विधानसभेचा विरोधी पक्षनेता ओरिजनल शिवसेनेचा, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेनेचे. सर्वच जर शिवसेनेचे बसलेले आहेत तर तुम्हाला उद्धव ठाकरेंचेच वावडे का, असा रोकडा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला केला. संपूर्ण शिवसेनाच तिकडे आहे. शिवसेनेशिवाय राज्य करता येत नाही ही भाजपची हालत आहे. मुख्यमंत्र्यांपासून दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेता सर्व शिवसेनेचे आहेत, पण शिवसेना नकोय, उद्धव ठाकरे नकोय, तुम्ही तुमचे उपाशी राहिला तरी चालेल… महाराष्ट्र अदानीच्या घशात घालणार ही भाजपची नीती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची घोषणा

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना जगणे सुसह्य होईल याला शिवसेनेचे प्राधान्य राहील, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी अधोरेखित केले. त्यासाठी पुढील महत्त्वाच्या घोषणा त्यांनी केल्या.

मुलींना मोफत उच्च शिक्षणाची सोय राज्य सरकारने केलेली आहे, मग मुलांनी काय गुन्हा केला आहे? महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण देईल. मुलगा आणि मुलगी हे दोघेही कुटुंबाचे आणि महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहेत.

शिवशाही सरकारच्या काळात पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. महागाई वाढू दिली नव्हती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुढची पाच वर्षे डाळ, तेल, साखर, तांदूळ आदी जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव दिला जाईल.

राज्यात महिला पोलिसांची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत, मग आमच्या बहिणींवर होणाऱ्या अन्यायाची तक्रार कोण घेणार? पोलीस ठाण्यात गेल्यावर कोणी तक्रार घ्यायची? महिला पोलिसांची पदे रिक्त असतील तर महिलांची सुरक्षा करणार कोण? महाविकास आघाडीचे सरकार महिलांसाठी पोलीस शिपाईपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्व पदे भरणार. तसेच महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणी उभारणार.

मुंबई मराठी माणसाची आहे. मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. त्यामुळे मुंबईवर मराठी माणसाचा आणि भूमिपुत्रांचा हक्क आहे. ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. महाविकास आघाडीचे सरकार धारावी आणि मुंबई परिसरात महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सतेज पाटलांवर कोल्हापूरच्या विजयाची जबाबदारी

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, कोल्हापुरातून चांगली सुरुवात झाली. कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतलं. बाळूमामांचे आशीर्वाद घेतले. आता तुमचं दर्शन घेऊन पुढे जाणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेशी गद्दारी करणारे कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर यांचा नामोल्लेख न करता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. आमदार केले, मानसन्मान, प्रेम दिले आणि सर्व दिल्यानंतरही शिवसेना नावाच्या आईवर वार करणारा माणूस तुमचा होऊ शकतो का, असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच उपस्थितांनी नाही… गद्दारीला क्षमा नाही, असा जोरदार प्रतिसाद दिला. यानंतर त्यांनी व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचे काwतुक केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुढे बोलवताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. शिवरायांचा महाराष्ट्र हा जोशपूर्णच पाहिजे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमधील विजयाची जबाबदारी आपण सतेज पाटील यांच्यावरच टाकतोय, असे सांगितले.

प्रत्येक जिह्यात शिवरायांचे मंदिर उभारणार

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारणार नाही, तर प्रत्येक जिह्यात महाराजांचे भव्य मंदिर उभारणार, अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात येताना तुमच्या सर्व नेत्यांना घेऊन या आणि महाराजांसमोर नाक घासा, असा टोला त्यांनी मोदी-शहांना लगावला. अयोध्येतील प्रभू श्रीरामाबद्दल आम्ही जसं ‘जय श्रीराम’ म्हणतो तसा ‘जय शिवराय’ हा आमचा जयघोष असेल, असे उद्धव ठाकरे म्हणताच उपस्थित जनसमुदायाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमवून सोडला.   केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण व्हावे म्हणून मालवणात घाईघाईने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला, पण तो आठ महिन्यांतच कोलमडून पडला. हीच का भाजप आणि मिंध्यांची शिवभक्ती, असा संतप्त सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींचा भाजप आणि मिंधेंनी निषेध केला नव्हता. महाराजांचा अपमान केला तर काय झाले, माझा तर अपमान नाही ना केला असे मोदी म्हणाले असतील, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला.

हे भूत मानेवरून उतरवा

रत्नागिरीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची सालटी काढली. ‘हा गद्दार मी तुम्हाला दिला होता. केवळ माझ्यावर भरोसा ठेवून तुम्ही त्याला निवडून दिलात. 2014 ला शेवटचे दोन दिवस असताना खडसेंचा फोन आला. आता काही आपलं जमणार नाही. आम्हाला वरून फोन आला युती करू नका, असे ते म्हणाले. युती तुटली आणि नाइलाज झाला. अचानक उमेदवार आणायचे कुठून? तेवढय़ात हे आलं भूत. नंतर 2019 ला तुम्ही दिलदारपणा दाखवलात. बंडखोरी केली नाहीत. बाळ माने म्हटल्यावर त्या भुताला मानेवर घेतलंत. आता हे भूत मानेवरून उतरायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी बाळ माने यांना सांगितले.

हे तर निरुद्योगमंत्री

गेल्या अडीच वर्षांत उद्योगमंत्र्यांनी घरचे उद्योग सोडून बाहेरचे किती उद्योग केले? एकतरी उद्योग यांनी महाराष्ट्रात सोडा, निदान रत्नगिरी जिह्यात, स्वतःच्या मतदारसंघात आणला का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. स्वतःच्या मतदारसंघात एकही उद्योग आणू न शकणारे हे निरुद्योग मंत्री पुन्हा बेशरमपणाने मत मागायला फिरत आहेत. त्यांना मते देणार का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीकरांना केला तेव्हा ‘नाही ’असा आवाज गर्दीतून घुमला.

लोकसभेला पैशाची मस्ती दाखवली

उद्योगमंत्र्यांचे भाऊ तिकडे राजन साळवींच्या विरोधात उभे आहेत. काय मोठमोठी होर्डिंग लोकसभेच्या वेळेला अगदी मुंबईपर्यंत लावली होती. पैशाची मस्ती दाखवली होती म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं व्यक्तिमत्व झालंच नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी किरण सामंत यांना हाणला.

बारसू रिफायनरी हद्दपार करू 

कोरोनाच्या काळामध्ये आपण साडेसहा लाख कोटींची सामान्य करार करून दाखवले होते आणि आपले सरकार टिकले असते तर हे सर्व उद्योग महाराष्ट्रात सुरू झालेले दिसले असते, असे नमूद करताना टाटा एअरबस कुठे गेला, गुजरात आणि माझ्या कोकणाच्या माथ्यावर काय मारतात बारसू रिफायनरी, असा सवाल त्यांनी केला. आम्ही नाणार रिफायनरी रद्द करून दाखवली, आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या, बारसू रिफायनरी हद्दपार करून दाखवतो, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला.

याप्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते गुहागरचे उमेदवार भास्कर जाधव, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, राजापूरचे उमेदवार उपनेते राजन साळवी, रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा, जिल्हाप्रमुख विलास चाळके, महिला जिल्हा समन्वयक नेहा माने, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुकासंपर्क प्रमुख मंगेश साळवी उपस्थित होते.

कोकण गुंडांच्या हाती देणार का?

इकडे दोन भाऊ आणि कोकणात खाली गेलात की तिकडे दोन भाऊ आणि वडील खायला बसलेत. कोणी दुसऱ्याने जगायचंच नाही, अशी यांची नीती आहे. त्यामुळेच कोकण कुणाचं…गुंडांचं की माझ्या कोकणवासीयांचं हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. तुमचं आणि तुमच्या मुलाबाळांचं भविष्य शिवशाही मानणाऱ्या महाविकास आघाडीच्या हाती द्यायचं की गुंडांच्या आणि गुर्मीत चालणाऱ्या लोकांच्या हाती द्यायचं याचा फैसला तुम्हाला करायचा आहे. कोकणात मुंबईपासून खालपर्यंत संपूर्ण किनारपट्टीत मला मशाल धगधगलेली पाहिजे आहे. त्या मशालीच्या आगीत खोकेबाजीचे राजकारण आपल्याला भस्म करायचे आहे, अशी साद उद्धव ठाकरे यांनी घातली.

उदय सामंतांनी प्रमोद महाजनांच्या नावाला विरोध केला होता

रत्नागिरी नगरपरिषदमध्ये युतीची सत्ता असताना आम्ही प्रमोद महाजन यांच्या नावाने रत्नागिरीत संकुल उभं करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा उदय सामंत यांनी विरोध करत त्यांच्या नगरसेवकांना बहिष्कार घालायला सांगितले. त्यावेळी कॉंग्रेसच्या तीन नगरसेवकांनी आम्हाला साथ दिली. त्यांचे मी आभार मानतो. भाजपचे माजी नगराध्यक्ष ज. शं. केळकर यांचे नाव आम्ही थिबा पॅलेसच्या रस्त्याला देण्याचा निर्णय घेतला तेव्हा उदय सामंत यांनी विरोध केला. मग आता मतांसाठी उंबरठे का झिजवताय? असा सवाल बाळ माने यांनी विचारला.

बाळूमामांना विनंती केलीधनगर समाज तडफडतोय

उद्धव ठाकरे यांनी अदमापूर येथे संत बाळूमामा यांचेही दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्याचा उल्लेख करत ते म्हणाले की, ‘मी आज बाळूमामांचे आशीर्वाद घेतले. त्यांना हात जोडून तीच विनंती केली. तुमचा धनगर समाज आरक्षणासाठी तडफडतोय, अस्वस्थ होतोय. त्याच्याकडे कोणी पाहत नाही. भाजपने सर्व समाज तोडूनफोडून टाकले आहेत,’ असेही उद्धव ठाकरे यावेळी बरसले.

अदानी प्रकल्प रद्द करणार

पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली धारावी अदानींना आंदण दिली जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार येताच तेथील अदानी प्रकल्प रद्द करून धारावीकरांना धारावीमध्येच उद्योगधंद्यासकट मोफत घरे देऊ, असे वचनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. मला वाटले, मुंबईच अदानीला विकली जातेय; पण कोल्हापूरचे पाणीही अदानीला विकले जातेय, चंद्रपूरमधील शाळा दिली जातेय. संपूर्ण महाराष्ट्र अदानीला विकला जातोय, फुकट दिला जातोय. आम्ही काय षंढ म्हणून बघत बसायचे का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. जो कुणी अदानीला मदत करतोय, भाजपला मदत करतोय, मोदी-शहांची पालखी वाहतोय तो महाराष्ट्रद्रोही आहे, महाराष्ट्राचा दुष्मन आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

न्यायदेवतेच्या डोळय़ावरची पट्टी काढली, पण…

तुमच्या मनात जो राग आहे. तो राग अडीच वर्षे आपण हृदयात धगधगत ठेवला. कधी वेळ येते आणि खोके सरकारला भस्म करतोय ही वाट महाराष्ट्र पाहत होता. तो क्षण आला आहे. आपल्याला न्यायदेवतेकडून न्याय मिळाला नाही. न्यायदेवतेच्या डोळय़ावरची पट्टी काढली, पण देशातील लोकशाही मरत आहे हे दिसत नाही. म्हणून मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दारांना 50 खोके दिले. मी अख्खी शिवसेना घेऊन गेलो असतो तर भाजपचे गोदाम रिकामे पडले असते. पण ही गद्दारी माझ्या रक्तात नाही. मी माझ्या महाराष्ट्राला गुलाम बनवून विकला जाणाऱ्यातील नाही. त्या औलादीचा नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

देवाभाऊ, दाढीभाऊ, जॅकेटभाऊ… आणि जाऊ तिथे खाऊ

‘लाडकी बहीण’ योजनेचा उदोउदो करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी यावेळी मिश्कील टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, एक भाऊ असेल तर ठीक, पण आता तीन-तीन भाऊ येत आहेत. देवाभाऊ, जॅकेटभाऊ आणि दाढीभाऊ. तुमचा भाऊ कोणता? देवाभाऊ तुमचा? जॅकेटभाऊ तुमचा? की दाढीभाऊ तुमचा? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. त्यावर हशा पिकताच ते म्हणाले की, हे काही भाऊबिऊ नाही, हे सर्व जाऊ तिथे खाऊ असे भाऊ आहेत. त्यावर पुन्हा हास्यकल्लोळ उठला.

राज्यात महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. बदलापुरात चिमुरडीवर अत्याचार झाल्यावर तिच्या पालकांची तक्रार पोलीस घेत नव्हते. तिच्या आईसमोर जाण्याची मिंध्यांची हिंमत आहे का? तिला कोणत्या तोंडाने लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देणार आहात? – उद्धव ठाकरे

सुरतमध्येही शिवरायांचे मंदिर उभारून दाखवू

इंग्रजांना विरोध करण्याकरिता महाराजांनी सुरत लुटली. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना भाजपवाले त्याच सुरतमध्ये घेऊन गेले होते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हय़ात आम्ही शिवरायांचे मंदिर बांधणारच आहोत आणि मला जमले तर सुरतमध्येही शिवाजी महाराजांचे मंदिर बांधून दाखवेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदी-शहा पंधरा दिवस महाराष्ट्रात या, पराभवाचे कडुनिंब घेऊन परत जा!

महाविकास आघाडी सरकारचा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचं वाकडं करू देत नव्हतो, महाराष्ट्राच्या हक्काचा एक कण देत नव्हतो एवढा दरारा दिल्लीत केला होता म्हणून त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले, असा हल्लाही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. भाजपला महाराष्ट्र विकायचा आहे. गुजरातला सर्व न्यायचे आहे. त्यामुळे गद्दारी करून सर्व विकले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी पुढील पंधरा दिवस देशभरातल्या नेत्यांना घेऊन महाराष्ट्रात रहावे आणि पराभवाचे कडुनिंब घेऊन परत निघून जावे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

1 मुलींसोबतच मुलांना मोफत शिक्षण

2 पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार

3 महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणी उभारणार

4 भूमिपुत्रांना मुंबईत स्वस्त घरे देणार

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘अमिताभ बच्चन असं होऊ देणार नाही…’, ऐश्वर्या – अभिषेक  यांचा होणार घटस्फोट? मोठी माहिती समोर ‘अमिताभ बच्चन असं होऊ देणार नाही…’, ऐश्वर्या – अभिषेक यांचा होणार घटस्फोट? मोठी माहिती समोर
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री अभिषेक बच्चन यांच्या खासगी आयुष्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. सांगायचं झालं तर, मुकेश...
… तर रोहित स्वत:च कसोटीतून निवृत्ती पत्करेल! कृष्णम्माचारी श्रीकांत यांचे भाकीत
लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने सलमान खानला पुन्हा धमकी; आठवड्यात पाच धमकीचे संदेश
भिवंडी ग्रामीणचे उमेदवार महादेव घाटाळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ; उद्धव ठाकरे यांची आज अंबाडीत दणदणीत सभा
वार्तापत्र – नाशिक मध्य, पश्चिम, देवळालीत शिवसेनेची विजयाकडे वाटचाल
महाराष्ट्र तुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही! अंबामातेचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी फुंकले रणशिंग
आज मुंबईत महाविकास आघाडीची दणदणीत सभा! राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या तोफा धडाडणार