मुरबाडमधून मिंधे गटाचा सुपडा साफ; सुभाष पवारांसह असंख्य कार्यकर्त्यांनी तुतारी फुंकली
मुरबाडमधून मिंधे गटाचा आता पुरता सुपडा साफ झाला आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व आणि मिंधे गटाचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश केला. पवार यांनी मिंधे गट सोडल्यामुळे मुरबाड, शहापूर आणि कल्याण तालुक्यात महायुतीची अवस्था दयनीय झाली आहे. भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी सुभाष पवार यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी प्रकाश पवार, धनाजी दळवी, रामभाऊ दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता भावार्थे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी उपसभापती भारती पष्टे, सागर कडव आदींनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुभाष पवार हे माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र आहेत. गोटीराम पवार यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व केले होते. गोटीराम पवार कुटुंबीयांना मानणारा मुरबाड तालुक्यात मोठा वर्ग आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुभाष पवार यांनी मिंधेंची साथ सोडल्यामुळे भाजपचे आमदार किसन कथोरे यांना मोठा धक्का बसला आहे.
किसन कथोरेंची दुहेरी कोंडी
माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यात मोठा वाद आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कथोरे यांनी आपल्याच पक्षाचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यामुळे कपिल पाटील यांचे समर्थक त्यांच्यावर नाराज आहेत. त्यातच आता सुभाष पवार यांनी मिंधे गटाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कथोरे यांची आता दुहेरी कोंडी झाली आहे. भाजपच्या अंतर्गत नाराजीचाही फटका कथोरे यांना बसणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List