दिवाळीत फटाक्यांचा जास्त साठा ठेवणारी दुकाने रडारवर, हायकोर्टाचे ठाणे पालिकेला कारवाईचे आदेश
दिवाळीत फटाक्यांची विक्री करताना जास्त फटाक्यांचा साठा ठेवणारे दुकानदार कारवाईच्या कचाटय़ात सापडले आहेत. ज्या दुकानांमध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त फटाके आढळतील त्या दुकानांवर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले आहेत.
कोपरी बचाव समितीच्या वतीने अॅड. वैभव गायकवाड आणि अॅड. रविराज परामणे यांनी जनहित याचिका दाखल केली. त्यावर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ठाण्यातील कोपरीच्या मुख्य लोकवस्तीतच फटाक्यांची दुकाने आहेत. मागील काही वर्षांत या दुकानांची संख्या वाढली असून मोठय़ा प्रमाणावर फटाक्यांचा साठा केला जात असल्याने दुर्घटना घडण्याची भीती आहे, याकडे अॅड. गायकवाड यांनी लक्ष वेधले. त्याची गंभीर दखल घेत खंडपीठाने ठाणे महापालिकेला कोपरी परिसरातील फटाक्यांच्या दुकानांचा आठवडाभरात सर्व्हे करून नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाचे आदेश
परवानगी दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त फटाक्यांचा साठा केला जातोय का? परवानगीशिवाय फटाक्यांची विक्री केली जात आहे का याची झडती पालिकेने घ्यावी.
ठाणे महापालिकेने संपूर्ण कोपरी परिसरातील फटाक्यांच्या दुकानांचा सर्व्हे करावा. नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर पालिकेने कायदेशीर कारवाई करावी.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List